
स्थैर्य, शिर्डी, दि.१: शिर्डीतील साई दर्शानासाठी आता
ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. साईबाबाच्या दर्शनासाठी आता भारतीय
संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. याची सक्ती करण्यात आली
नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे.
जगभरातून
अनेक भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. अनेकजण पर्यटनाला यावे
तसे तोडक्या कपड्यांमध्ये येतात. त्याच कपड्यांमध्ये ते दर्शनालाही जातात
अशी भाविकांची तक्रार होती. संस्थानाने या तक्रारीची दखल घेत, यापुढे साई
मंदिरात भारतीय पेहरावात यावे असे आवाहन भक्तांना केले आहे. संस्थानने
मंदिर परिसरात असे सूचनाफलक लावले आहेत. या फलकात म्हटले की, ‘साईभक्तांना
विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय
संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी.’ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत हे
सूचना फलक लावण्यात आले आहेत.