

फलटण शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला वेग आला असून, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भर उन्हात सुट्टीच्या दिवशी मारवाड पेठ, दगडी पूल येथे कामाची पाहणी केली. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १६ मे : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेली फलटणकर जनता आता मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, शहरातील नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे नागरिकांना दुर्गंधी आणि सांडपाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई होणे अत्यंत गरजेचे असते. या अनुषंगाने फलटण नगरपरिषदेकडून शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर स्वतः रस्त्यावर उतरून या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.
जुन्या सत्ताधाऱ्यांसारखी दुर्लक्ष करण्याची वृत्ती नाही:
या मोहिमेबाबत बोलताना माजी नगरसेवक अनुप शहा यांनी नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “यापूर्वीचे जुने सत्ताधारी नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रशासनाच्या अंगावर किंवा वाऱ्यावरच सोडत होते. परंतु, विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळेच ते स्वतः रखरखत्या उन्हाचा विचार न करता बाहेर पडून नालेसफाईच्या कामकाजाची बारकाईने पाहणी करत आहेत.”
सुट्टीच्या दिवशीही भर दुपारी कामाचा आढावा:
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रभाग क्रमांक ८ आणि १२ मधील मारवाड पेठ व दगडी पूल परिसरातील मान्सूनपूर्व नाला स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवार अशी सुट्टी असतानाही त्यांनी भर दुपारी या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. नगराध्यक्ष स्वतः आपल्या आरोग्याची पर्वा न करता शहराच्या स्वच्छतेसाठी लक्ष घालत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्षांसोबत नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा आणि परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
