

गिरवी (ता. फलटण) येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात वैशाखी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने आणि दहीहंडीने मोठ्या उत्साहात झाली.
स्थैर्य, फलटण, दि. १६ मे : गिरवी (ता. फलटण) येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात वैशाखी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या भरगच्च कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नरसिंह जन्म सोहळा व महाप्रसाद:
या तीन दिवसीय उत्सवाची सुरुवात गुरुवारी (दि. ३० एप्रिल) नरसिंह जन्म सोहळ्याने झाली. या निमित्ताने मंदिरात श्रींची विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात आला. उन्हाळ्याची तीव्रता पाहता यावेळी उपस्थित गावकऱ्यांना पारंपारिक डाळ-पन्ह्याचा प्रसाद वाटप करण्यात आला, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला.
महापूजा, प्रवचन आणि भव्य पालखी प्रदक्षिणा:
दिनांक १ मे रोजी मंदिरात गोपाळकृष्णाची आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती. यावेळी विष्णुसहस्रनाम आणि गीता पठण करण्यात आले. दुपारी आरती झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर तपोमूर्ती श्री वेणू भारती महाराज यांचे अमृतमय प्रवचन पार पडले. सायंकाळी वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ, मृदंग आणि ताशांच्या निनादात श्रींची भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखी सोहळ्याने संपूर्ण गावचे वातावरण भक्तिमय झाले होते.
काल्याचे कीर्तन आणि दहीहंडीने उत्सवाची सांगता:
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, दिनांक २ मे रोजी ह. भ. प. धनंजय ढेरे यांचे सुश्राव्य आणि रसाळ असे काल्याचे कीर्तन पार पडले. कीर्तनानंतर पारंपारिक पद्धतीने गोपाळांचे विविध खेळ रंगले आणि ‘दहीहंडी’चा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.
हा तीन दिवसीय उत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिराचे ज्येष्ठ विश्वस्त जयंतराव देशपांडे आणि रघुनाथ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद देशपांडे, गौरव देशपांडे यांच्यासह सर्व ग्रामस्थ व भाविकांनी विशेष सहकार्य केले.
