

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज पालखी महामार्गाच्या पाहणीसाठी फलटण दौऱ्यावर असून, सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 14 मे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी हे आज (गुरुवार, दि. १४ मे) बहुचर्चित संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी फलटण दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान सकाळी ११ वाजता सुरवडी (ता. फलटण) येथील हॉटेल निसर्ग एक्झिक्युटिव्ह येथे त्यांची विशेष पत्रकार परिषद संपन्न होणार आहे. या दौऱ्याचे कव्हरेज करण्यासाठी त्यांच्यासोबत पुण्यातून तब्बल ७० पत्रकारांचा ताफा आला असून, फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील पत्रकारही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
‘अंतर्गत मिसींग’ पालखी मार्गाचे काम सुरू:
गेल्या वर्षी फलटण येथे झालेल्या एका जाहीर सभेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे फलटण शहरातून जाणाऱ्या ‘अंतर्गत मिसींग पालखी मार्गा’ची मागणी केली होती. या मागणीला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ना. गडकरी यांनी त्याच सभेत या मार्गाला मंजुरी दिली होती. सध्या या महत्त्वपूर्ण मार्गाचे काम फलटण शहरात वेगाने सुरू असून, आजच्या दौऱ्यात या कामाचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
रणजितदादांच्या पाठपुराव्यातून फलटण बनले ‘हायवे हब’:
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे फलटण तालुक्याची आता ‘हायवेवरील गाव’ अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग (आळंदी ते पंढरपूर) हा फलटण तालुक्यात जवळपास पूर्णत्वास गेला आहे. यासोबतच, बारामती ते सांगली या महामार्गापैकी फलटण ते बारामती या रस्त्याचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून, फलटण ते दहिवडी या रस्त्याचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्गांचे जाळे:
सध्या सुरू असलेल्या या महामार्गांच्या कामांव्यतिरिक्त, प्रस्तावित असलेला ‘पुणे ते बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर हायवे’ सुद्धा फलटण तालुक्यातून जाणार आहे. यामुळे आगामी काळात फलटणच्या चारही बाजूंना राष्ट्रीय महामार्गांचे मोठे जाळे तयार होणार असून, दळणवळण, रोजगार आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. ना. गडकरी यांच्या आजच्या दौऱ्यामुळे या सर्व विकासकामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
