जयंत पाटलांकडून शिवसैनिकांना दुय्यम वागणूक


 

स्थैर्य, सांगली, दि.२३: राज्यात महाविकास
आघाडी सरकार असताना सांगली जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांवरील
निवडींमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्याचे
पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक
मिळत आहे, अशा तक्रारी शिवसैनिक करीत आहेत. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
यांच्या दौ-यातही शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचला.
या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांची भेट घेईन व त्यांच्यापुढे आपले गा-हाणे मांडेन, असे आश्वासन मंत्री
देसाई यांनी दिले.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
सांगलीतील जैन कच्छी भवनमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
होते. या मेळाव्यात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसैनिकांशी
संवाद साधला. यावेळी अनेक पदाधिका-यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी
मांडल्या. स्थानिक शासकीय समित्यांवर शिवसेनेतील पदाधिका-यांना योग्य संधी
मिळत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मंत्री
देसाई म्हणाले, ‘राज्यात किमान समान कार्यक्रमानुसार महाविकास आघाडी
सरकारचे कामकाज चालते. सरकारमध्ये तीनही पक्षांना स्थान असल्याने जिल्हा
पातळीवरील शासकीय समित्यांमध्ये शिवसैनिकांना समान स्थान मिळाले पाहिजे.
मात्र, सांगली जिल्ह्यात शासकीय समित्यांच्या निवडींमध्ये शिवसैनिकांवर
अन्याय झाला आहे. याबाबत जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिका-यांनीही माझ्याकडे
तक्रारी केल्या आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबाबत तक्रारी असतील तर
त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिका-यांसह पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या जातील. मुख्यमंत्री त्यातून मार्ग
काढतील, त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!