फलटण: जिंती नाका परिसरात ‘अभि भाई’ची दहशत; हेअर पार्लरमध्ये घुसून १० हजारांच्या हप्त्यासाठी सशस्त्र मारहाण व तोडफोड


फलटण शहरातील जिंती नाका येथील ‘किंग युनिसेक्स पार्लर’मध्ये घुसून दरमहा १० हजार रुपये हप्त्याची मागणी करत कामगारांना शस्त्राने मारहाण व तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २० मे : फलटण शहरातील जिंती नाका परिसरात एका ‘किंग युनिसेक्स पार्लर’ नावाच्या केस कटिंगच्या दुकानात घुसून, “तुला दुकान चालवायचे असेल तर महिन्याला १० हजार रुपये हप्ता दे,” अशी खंडणी मागत दुकानातील कामगारांना धारदार हत्याराने आणि लोखंडी कड्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून, दुकानाची व बाहेरील एका कारची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मंगळवारी (दि. १९ मे) सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास घडली.

हप्त्यासाठी सशस्त्र धमकी:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी दुकानातील कामगार नेहमीप्रमाणे आपले काम करत होते. त्यावेळी दुकानासमोर एक काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली शाईन मोटारसायकल (क्र. MH 53 8192) येऊन थांबली. त्यावरून दोन इसम आले आणि त्यांनी थेट दुकानात घुसून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एका पांढऱ्या रंगाचा शर्ट व जिन्स पँट घातलेल्या इसमाने आपल्या कमरेतून सुमारे दोन फुटांचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढले. तो कामगारांना धमकावत म्हणाला, “मला अभि भाई म्हणतात. तू मला ओळखतोस का? तू दुकान चालू केले आहे, तुला खल्लास करीन. तू मला महिन्याला १०,००० रुपये हप्ता दे.”

कामगारांना मारहाण आणि तोडफोड:

हप्त्याची मागणी करत त्याने दुकानातील सामानाची तोडफोड केली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या (लाल रंगाचा शर्ट व टोपी घातलेल्या) अनोळखी इसमाने दुकानातील कामगार मोहम्मद फरमान याच्या तोंडावर हातातील लोखंडी कड्याने मारून त्याला जखमी केले. तसेच, दुसरा कामगार अजिम अहमद यालाही डाव्या डोळ्याजवळ लोखंडी कड्याने मारून गंभीर जखमी केले.

‘नादी लागला तर खल्लास करीन’:

या मारहाणीनंतर संबंधित मुख्य आरोपीने, “मी भाई अभिजित जाधव… कोणी माझ्या नादी लागला तर, मी एकेकाला खल्लास करीन,” अशी धमकी देत दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका कारच्या काचा फोडल्या आणि परिसरात मोठी दहशत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवर बसून तेथून पसार झाले.

आरोपींवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल:

याप्रकरणी जखमी कामगारांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात अभिजित जाधव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार (लाल शर्ट व टोपी घातलेला) यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम ३०८(५), ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३२४(४), ३(५) नुसार खंडणी, दुखापत आणि दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) शिंदे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!