
स्थैर्य, पुणे, दि.११: देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) डोस पुरवण्याचीही ऑर्डर दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सीरम कंपनीतून देशाच्या इतर भागांत लसीची वाहतूक करण्याचे काम कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीने तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेले ट्रक्स सज्ज ठेवले आहेत. या अत्याधुनिक ट्रक्समध्ये उणे 25 अंश ते + 25 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच प्रत्येक ट्रक हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. कोरोना लसीच्या वाहतुकीदरम्यान या ट्रक्सना संबंधित राज्याच्या पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाईल अशी माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे.