दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२४ | फलटण |
लोणंद पोलिसांनी लोणंद गावातून मोटारसायकलींची चोरी करणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून या टोळीतील दोन आरोपींकडून तीन मोटारसायकलींसह एकूण २,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लोणंद (ता. खंडाळा) गावातून मोटारसायकल चोरीचे गुन्हे लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चोरीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी या गुन्ह्यांबाबत तपास सुरू करून आरोपी निश्चित केले होते.
दि. २३ एप्रिल २०२४ रोजी यातील दोन आरोपींना शोधून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता, त्यांनी आणखी एका साथीदारासह लोणंद गावच्या हद्दीतून दोन मोटारसायकली चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेल्या दोन मोटारसायकली व गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल अशा तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, गुन्हे प्रकटीकरणचे पो.ह. संतोष नाळे, सर्जेराव सूळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे तसेच स.पो.फौ. पाडवी, पो.ह. नाना भिसे, विजय पिसाळ, बापूराव मदने, सिध्देश्वर वाघमोडे, अभिजित घनवट यांनी केली आहे.