विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा; आता बस झाले, संघटनेची जबाबदारी द्या – अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२३ । मुंबई । मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र, आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले. पण आता बस झाले, मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, असे बोलत थेट विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते असताना आणि सभागृहात आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमोर अजित पवार यांनी ही मागणी केली.

तिथेही भाकरी फिरवा
मंत्रिपद हवे असेल तर स्वतःच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजेत. मलाही उपमुख्यमंत्रीपद हवे असेल तर माझ्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजेत. पक्षाचा युवक सेल आहे, ३५ ते ४० वय झाले तरी पदाधिकारी तिथेच आहेत, असे म्हणत विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांचाही समाचार घेत तिथेही भाकरी फिरवली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

मी इतके वर्ष विविध पदांवर काम केले. एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले आहे. ते सांभाळत असताना काहीचे म्हणणे आहे तू कडक वागत नाही. आता म्हटले त्यांची गचांडी धरू की काय? आता बस झाले, मला यातून मुक्त करा. संघटनेची जबाबदारी द्या आणि पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा.


Back to top button
Don`t copy text!