फलटणमध्ये झाले आधुनिक श्रावणबाळाचे दर्शन; अर्धांग वायूमुळे पाय गमावलेल्या आईची पायी वारीची इच्छा करतोय पूर्ण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२३ | फलटण |
अर्धांग वायूमुळे पाय गमावलेल्या आईची पायी वारी पूर्ण करण्याचा चंग बांधत आपल्या मुलांसमवेत पेठ वडगाव येथील एक तरुण आईला व्हीलचेअरवर बसवून पायी वारी करीत असून या आधुनिक श्रावणबाळाचे आई प्रेम पाहून अनेकजण नतमस्तक होत आहेत.

अंध आई- वडिलांना कावडीत बसवून तिर्थयात्रेला नेणार्‍या श्रावणबाळाची कथा आपण अगदी लहान असल्यापासून ऐकत आलो आहोत. तो श्रावणबाळ कसा होता आणि तो आई- वडिलांना नेमकी कशी यात्रा घडवून आणत होता, हे आपण केवळ ऐकलेलं आहे, पण आजचा आधुनिक श्रावणबाळ कसा असू शकतो किंवा कसा आहे, हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघण्याचा अनुभव सध्या वारीतील भाविक घेत आहेत.

आपण या जगात प्रवेश केल्यापासून मृत्यूपर्यंत अनेक नाती आपल्या जीवनात पार पाडतो. काही फक्त थोड्या काळासाठी असतात, काही आपल्याला फसवतात आणि काही आपल्याला सर्वात जास्त गरज असताना सोडून जातात आणि काही आपल्या स्वतःच्या गुणांमुळे आपल्यासोबत असतात. पण प्रत्येकाची काळजी, आपुलकी आणि एका व्यक्तीबद्दलच्या प्रेमाच्या पलीकडे असलेली गोष्ट म्हणजे आई. ती प्रत्येक मुलाची सर्वोत्तम प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहे. ती आपल्याला आपल्या जीवनातील पहिले पाऊल कसे उचलायचे, कसे बोलावे, कसे लिहावे आणि वर्तनाचे धडे शिकवते. जे आपल्याला चांगले प्रौढ बनण्यास आणि या जगात स्वतःला आचरण करण्यास मदत करते. या आईचे काहीअंशी ऋण फेडण्याचा प्रयत्न पेठ वडगांव (जिल्हा कोल्हापूर) येथील चंदर निवृत्ती गिरी हे आपल्या दोन्ही मुलांसमवेत करत आहेत. त्यांची आई सुशीला निवृत्ती गिरी (वय ६५, रा. पेठवडगांव, कोल्हापूर) पंढरपूरला दर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला एसटीद्वारे जात असत. एकदा तरी आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करावी, अशी त्यांची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. दहा वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले असून गेल्या दहा वर्षापासून त्या आळंदी ते पंढरपूर पायी वारी करण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र, दोन्ही पाय अधू झाल्याने त्यांना चालता येत नाही, उठता बसता येत नाही. अशा परिस्थितीत आईच्या उतारवयात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग चंदर गिरी (वय ४५) यांनी बांधला. घरच्या लोकांशी बोलून त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी आईची पायी यात्रा सफल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नात त्यांचा मुलगा ऋषिकेश आणि मुलगी मीरा यांनी पण साथ देत पायी चालत येण्याचा निर्णय घेतला. पेठ वडगाव वरून ते आळंदीला एसटीने आले. तेथून व्हीलचेयरवर आईला बसवून ते पायी वारी करत आहेत. चंदर आणि त्यांची मुलगी मीरा हे आळीपाळीने पाठीमागून व्हीलचेअर ढकलत आहेत, तर मुलगा ऋषिकेश पुढे दोरी बांधून व्हीलचेअर ओढत आहे.रस्त्यावरून येता-जाता अनेकजण हे मातृप्रेम बघून या आधुनिक श्रावणबाळाचे कौतुक करत आहेत आणि नतमस्तक होत आहेत.

आळंदीहून फलटणपर्यंतचा त्यांचा प्रवास सुखकर झाला असून वारीच्या पुढे ते गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून सहा तास अगोदर किंवा नंतर प्रवास करत आहेत. रात्रीच्या वेळेस आडोसा बघून ते मुक्काम करतात व सकाळ झाली की पुन्हा त्यांचा पायी प्रवास सुरू होतो. वाटेत कोणी खायला दिले तर खातात अन्यथा हॉटेलमधून साधे खाद्यपदार्थ विकत घेऊन बाहेर आणून खातात.

दररोज वापरणारे साहित्य, कपडे व्हील चेअरवर ठेवून त्यावर सुशीला गिरी बसत आहेत. हातात श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन विठू नामाचा गजर करीत त्यांचा प्रवास सुरू आहे.

माझ्या आईने अत्यंत कष्ट घेऊन मला सांभाळले असून तिची उतारवयातील पायी वारीची इच्छा पूर्ण करण्याचा मी चंग बांधलेला आहे. आत्तापर्यंतचा निम्मा प्रवास परमेश्वर कृपेने चांगला झाला असून आजारी असून सुद्धा आईला अद्याप कसलाही त्रास झालेला नाही. विठू नामाच्या चरणी तिचे मस्तक टेकवून आम्ही माघारी जाणार आहोत. भगवान श्रीकृष्ण आणि विठ्ठलाच्या कृपेने आमची पायी वारी निश्चितच पूर्ण होईल.

– चंदर गिरी


Back to top button
Don`t copy text!