

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी करत फलटण येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई-बंगलोर ग्रीन कॉरिडॉर फलटणमधून जाणार असल्याची घोषणा करत रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले.
स्थैर्य, फलटण, दि. 14 मे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची (NH965) पाहणी केली. सकाळी दिवेघाट व जेजुरी येथील कामांची पाहणी करून ते फलटण येथे दाखल झाले. सुरवडी (ता. फलटण) येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार परिषदेत त्यांनी ‘मुंबई – बंगलोर ग्रीन कॉरिडॉर’ फलटणमधून जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पुन्हा एकदा केली. या मोठ्या प्रकल्पासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, मंत्री गडकरी यांनी आपल्या मनोगतात रणजितसिंह यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांचे कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती:
या पत्रकार परिषदेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार अभिजीत पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण:
यावेळी माहिती देताना ना. नितीन गडकरी म्हणाले की, पालखी मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दिवे घाटातील अडचण सुटली असून, तेथील रस्त्यांची रुंदी वाढवली आहे. हे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. जेजुरी येथे बायपासला स्थानिकांचा विरोध होता, त्यामुळे त्या ठिकाणी नव्याने उड्डाणपुलाची (Flyover) घोषणा त्यांनी केली. तसेच, फलटणमधील अंतर्गत पालखी मार्गाच्या कामांसाठी ९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दर्जाबाबत कोणतीही तडजोड नाही:
“रस्त्यांच्या दर्जाच्या बाबतीत मी अत्यंत कडक आहे. रस्ता चांगलाच झाला पाहिजे, असा माझा आग्रह होता,” असे गडकरी म्हणाले. या कामात अनेक अडचणी आल्या, मात्र इथल्या आमदार आणि खासदारांनी मोठे सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. या महामार्गावरील १३ पुलांच्या उभारणीत ‘अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स काँक्रीट’ (UHPC) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
महामार्ग ‘ग्रीन कॉरिडॉर’ व्हावा:
वाढत्या प्रदूषणाची समस्या गंभीर असल्याचे नमूद करत हा ‘ग्रीन महामार्ग’ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वारकरी आणि प्रवाशांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी अस्तित्वात असलेल्या झाडांचे संगोपन करावे आणि नवीन झाडे लावावीत, असे आवाहन त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संस्थांना केले.
पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना:
पालखी मार्गाची माहिती देताना ते म्हणाले की, या मार्गावर ४६ तलाव बांधण्यात आले असून शेती व पाण्यासाठीही विशेष कामे केली आहेत. ४० हजार नवीन झाडे लावली असून ४५० झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे. “पालखी मार्ग हा धार्मिक उद्दिष्टासाठी असला, तरी या महामार्गांमुळे पर्यटन वाढेल, रोजगार निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ होऊन त्यांची आर्थिक उन्नती होईल, याचा मला आनंद आहे,” असे गडकरी म्हणाले.
यावेळी महामार्गाची वैशिष्ट्ये आणि प्रगती सांगणारी एक विशेष चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.