
आज त्या ऐतिहासिक घटनेला ८७ वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवशी, २३ एप्रिल १९३९ रोजी या फलटण नगरीतील अस्पृश्य बांधवांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आगमन झाले होते. त्यांनी त्यावेळी मांडलेली मते आजच्या काळातही अत्यंत दिशादर्शक आहेत. त्यांनी एकंदरीत अस्पृश्य जनतेच्या दयनीय स्थितीविषयी चिंता व्यक्त करून त्यांच्या उद्धारासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजनाही सुचवल्या होत्या.
संस्थानाधिपतींकडून शाही स्वागत आणि जंगी मिरवणूक:
फलटण संस्थानाधिपतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगाऊच पत्र पाठवून फराळाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, देवरुखकर, गायकवाड, रणपिसे, सावंत, के. बी. जाधव, शामराव भोळे वगैरे मंडळींसह बरोबर ४ वाजता फलटण संस्थानाधिपतींच्या खास मोटारीने राजवाड्यात आले. तिथे राजेसाहेबांचे व त्यांचे सार्वजनिक कार्याबाबत थोडे बोलणे झाल्यानंतर थाटाची चहा-पार्टी झाली. चहा-पार्टीनंतर राजवाड्यात डॉ. बाबासाहेब समवेत राजेसाहेब व पाहुणे मंडळी यांचा फोटो काढण्यात आला.
नंतर सायंकाळी ५ वाजता राजवाड्यापासून एक जंगी मिरवणूक निघून ती सभेच्या मंडपापर्यंत आली. सभेसाठी भव्य मंडप आणि स्टेज तयार करण्यात आला होता. संस्थानातील सर्व स्त्री-पुरुष सभेस मुद्दाम उपस्थित होते. सुरुवातीला स्वागत पद्ये व पोवाडे झाल्यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळींचे स्वागत करून, ‘आपल्या समाजाने संघटित राहणे किती हिताचे व महत्त्वाचे आहे’ याचे वर्णन केले. शेवटी त्यांनी डॉ. बाबासाहेबांना परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाले. सभेसाठी फलटण संस्थानातील व संस्थानाबाहेरील सुमारे दहा-बारा हजार लोकांचा जनसागर उसळला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्फूर्तिदायक विचार:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलण्यास उभे राहिले. ते म्हणाले:
“मी अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या परिषदेसाठी जरी इथे आलो असलो तरी सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय, आज जगात काय चालले आहे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वसाधारण जनता ही सध्या लोकशाहीची भाषा बोलत असून लोकशाहीच्या तत्त्वावर सुधारणा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी संस्थानिकांनीही आपला दृष्टिकोन बदलून प्रजेला जितके अधिक अधिकार देण्यासारखे असतील तेवढे दिले पाहिजेत.
पूर्वीच्या काळी राजांचे कर्तव्य म्हणजे केवळ ‘गो-ब्राह्मण प्रतिपाल’ करणे एवढेच समजले जात असे. खेड्यापाड्यातून शाळा काढून लोकांना सुविद्य करणे अगर लोकहिताच्या गोष्टी करणे यांचा प्राचीन ग्रंथांमध्ये कोठेच मागमूस आढळत नाही. या सर्व लोककल्याणाच्या गोष्टी आपण इंग्रजांपासून शिकलो आहोत, ही कबुली देण्यास लाजण्याचे काहीच कारण नाही. देशातील आपली जनता ज्ञानहीन व अधिकारहीन अशी आहे. देशातील शेकडा ९० लोक आज अज्ञानात व गुलामीत दिवस कंठीत आहेत, याला जर कोणी कारण असेल तर तो इथला धर्म आणि जुन्या रूढी आहेत.
इंग्रज आमदानी सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर, लोककल्याण करायचे असल्यास राजकीय सत्ता प्रजेच्या प्रतिनिधींच्या हातात असणे योग्य असे वाटू लागले. १९३७ पासून काही सुधारणा अमलात आल्या आणि काँग्रेसची सरकारे आली, परंतु या प्रजासत्ताक राज्यपद्धतीमुळे गोरगरीब, शेतकरी आणि मजुरांचे खऱ्या अर्थाने कल्याण झालेले नाही. जोपर्यंत या देशात गरिबांचे हितसंबंध श्रीमंत वर्गापासून भिन्न आहेत, तोपर्यंत केवळ लोकशाहीच्या नावाखाली श्रीमंतांच्या हाती सत्ता असण्याने गरिबांचे कल्याण होणार नाही.”
समाज आणि शासनासाठी सुचवलेल्या उपाययोजना:
यावेळी डॉ. बाबासाहेबांनी समाजाच्या उत्कर्षासाठी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या आणि उपाययोजना मांडल्या:
१. शेती आणि रोजगार: प्रजेचे रक्षण करून त्यांच्या पोटापाण्याची सोय शासनाने करावी. ज्या लोकांना अस्पृश्यतेमुळे कोणताही धंदा-रोजगार करता येत नाही, त्यांना आपल्या राज्यात असलेल्या पडीक जमिनी सरकारने वहिवाटीस (कसायला) द्याव्यात.
२. शिक्षणासाठी मदत: शिक्षणासारख्या आवश्यक कामी लागणारा पैसा खर्च करण्यास या वर्गाजवळ काही नसल्याने, सरकारने या वर्गाच्या मुलांना पाटी, पुस्तके, स्कॉलरशिप वगैरे देऊन शिक्षणासाठी हातभार लावावा.
३. सत्तेत वाटा: संस्थानात असलेल्या कायदेमंडळात, तसेच म्युनिसिपालिट्या, जिल्हा बोर्ड वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या वर्गाचे (दलितांचे) प्रतिनिधी आवश्यक घेण्यात यावेत.
समाजाला कडक शब्दांत दिलेला संदेश:
शेवटी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब म्हणाले, “एक कटूसत्य तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. आपल्या समाजात मृत मांसाहाराची जी अनिष्ट रूढी प्रचारात आहे, ती रूढी आपल्या समाजाच्या अवनतीस कारण झाली आहे. ती आपण ताबडतोब बंद करावयास हवी. ही घाण जोपर्यंत आपण काढून टाकीत नाही, तोपर्यंत समतेचा लढा लढण्यास आपण अपात्र ठरू. तरी ही रूढी अविलंब बंद करावी.”

