फलटणला पावसाचा दिलासा; कोळकीत नारळाच्या झाडावर वीज कोसळली, मोठी दुर्घटना टळली


फलटण शहर व परिसरात आज सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोळकी येथे नारळाच्या झाडावर वीज पडली, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

स्थैर्य, फलटण, दि. 14 मे : गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या फलटणकरांना आज सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. अचानक ढग दाटून आले आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसाच्या आगमनामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला असून, उष्णतेच्या लाहीलाहीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

जनजीवन काही काळ विस्कळीत, मात्र बळीराज सुखावला:

उन्हाच्या तीव्र झळा आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना या पावसामुळे सुखद धक्का बसला. संध्याकाळी झालेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून, सखल भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. मेघगर्जनेसह आलेल्या या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मान्सूनपूर्व सरींच्या या आगमनाने बळीराजासह सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून यामुळे शेतीकामांनाही वेग येण्याची शक्यता आहे.

कोळकीत नारळाच्या झाडावर कोसळली वीज:

या पावसादरम्यान कोळकी (ता. फलटण) येथे वीज पडल्याची धक्कादायक घटना घडली. शिंगणापूर चौकानजीक असलेल्या रिक्षा स्टॉपजवळ एका नारळाच्या झाडावर ही वीज कोसळली. सुदैवाने, वीज पडली त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एक मोठी दुर्घटना टळली.

आगीवर वेळीच नियंत्रण:

वीज पडल्यानंतर संबंधित नारळाच्या झाडाला काही प्रमाणात आग लागली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी तातडीने फलटण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले आणि कोळकी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले. सुदैवाने आगीचे स्वरूप फारसे मोठे नसल्यामुळे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग आटोक्यात आली.

भरवस्तीत आणि रिक्षा स्टॉपसारख्या गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!