
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । मुंबई । शिक्षणाची जननी माता सावित्रीबाई फुले व सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले या दाम्पत्याने मनुवादी ब्राम्हणी जुलमी धोरणांना न जुमानता अनेक अपमान, निंदा-नालस्ती, शेणगोळे, दगड धोंडे सहन करीत भिडे वाडा येथे भारतातील पहिली महिला शाळा सुरू करून ब्राम्हण महिलांसहित समाजातील सर्वच स्तरातील अशिक्षित महिलांना मोफत शिक्षण सुरू करून देशात महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
माता सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागामुळेच आज अखिल भारतातील महिला वर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उच्चपदभार सांभाळत आहे, परंतु मनुस्मृतीच्या अलिखित नियमांत स्वतःला बांधून घेतलेल्या आताच्या महिला वर्गाला त्यांच्या त्यागाचा विसर पडला असून त्यांच्या कार्याची कोणतीही कदर राहिलेली नाही अशी खंत सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी खंत व्यक्त केली, सावित्रीबाईंच्या जीवनपटावर प्रकाश टाकत असतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात ते पूढे म्हणाले की “शिक्षण हे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आदर्श जीवनमार्ग होय”
बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माता सावित्रीबाई फुले यांचा १९२ वा जयंती महोत्सव मा. सभापती, इंदूमिलचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल येथे संपन्न झाला.
सदर प्रसंगी आदर्श बौद्धाचार्य मंगेश पवार (गुरुजी) यांनी आपल्या मधुर वाणीने धार्मिक विधी पार पाडला, तसेच सूत्रसंचालनाची धुरा सरचिटणीस राजेशजी घाडगे यांनी सांभाळली व प्रास्ताविक महिला मंडळ सचिव अंजलीताई मोहिते यांनी केले.
सदर प्रसंगी प्रमिलाताई मर्चंडे, प्रज्ञाताई जाधव, सुजताताई जाधव, सुशिलाताई जाधव, माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपसभापती विनोदजी मोरे आदी मान्यवरांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाचा आढावा घेत आपले विचार मांडून उपस्थितांस मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर उपकार्याध्यक्ष एच.आर.पवार, चंद्रमनी तांबे, खजिनदार नागसेन गमरे, सचिव श्रीधर साळवी, यशवंत कदम, संदेश खैरे, राजाभाऊ तथा रामदास गमरे, रमेश जाधव, मुकुंद महाडिक, निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव आदी विश्वस्त, विविध समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्या, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सरतेशेवटी माता सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व उपस्थितांचे आभार मानून सरचिटणीस राजेशजी घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले व मंगेश पवार यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता येतील केली.