समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विज्ञान पोहोचविण्याचा निर्धार; सायन्स कम्युनिकेटर काँग्रेसमध्ये नवसंशोधकांनी केले सादरीकरण


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । नागपूर । वनस्पतींपासून वीज निर्मिती, नवजात बालकांच्या आरोग्य चाचण्यांचे महत्त्व, मातीतील किटांणूंमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून बालकांचे संरक्षण, मासेमारी उत्पादनातील वाढ, हवामान शास्त्राचा स्मार्टग्रीडसाठी उपयोग, महाडेक दगडांचे संरक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाचे महत्व विशद करणाऱ्या संशोधनांचे सादरीकरण करत आज भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये वैज्ञानिकांनी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विज्ञान पोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विज्ञापीठात सुरु असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आज सायन्स कम्युनिकेटर काँग्रसचे आयोजन करण्यात आले. यात विविध सत्रांमध्ये संशोधनकार्याचे सादरीकरण झाले.

वनस्पतींपासून वीज निर्मितीच्या संशोधनामुळे देशातील ऊर्जास्त्रोतात भर पडेल

वनस्पतींपासून वीज निर्मितीचे नव संशोधन पटना येथील महिला महाविद्यालयाच्या डॉ.पिंकी प्रसाद यांनी सादर केले. वनस्पतींमधील कॅल्सियम,झिंक,कॉपर,आर्यन आणि मेटल या घटकद्रव्यांचा उपयोग करून वीज निर्मितीचे संशोधन कार्याबाबत त्यांनी माहिती सादर केली. उर्जा संकट टाळण्यासाठी आतापासूनच वनस्पतींपासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सांघिक प्रयत्न व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य चाचण्यांनी नवजात बालकांच्या विकारांवर मात

भारतात थॅलेसेमिया, डाऊनसिंड्रोम आदी आजारानेग्रस्त बालके आणि त्याचा कौटुंबिक व सामाजिक जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी नवजात बालकांच्या जन्मापासून तीन दिवसांच्याआत महत्वाच्या पाच आरोग्य चाचण्या मोफत व्हाव्यात, असे मत पंजाब विद्यापीठाच्या डॉ राजींदर कौर यांनी मांडले. भारत देशात दररोज जन्माला येणाऱ्या बालकांपैकी 1500 नवजात बालकांमध्ये अनुवांशिक विकार आढळतात. या ठराविक बालकांचा विकास पूर्णपणे खुंटतो. अशा बालकांचे संगोपन हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरते व एका सुदृढ समाजासाठीही मारक ठरते असे डॉ. राजींदरकौर म्हणाल्या. नवजात बालकांची चाचणी करून त्यांच्यातील व्यंगत्वदूर करण्यासाठी 1960 पासून जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम सुरु असून भारतातही याबाबत पाऊले पडण्याची गरज असल्याचे त्यांनी मांडले. अनुवांशिक व्यंगत्वाचे निदान करणाऱ्या महत्वाच्या पाच आरोग्य चाचण्या सर्वांना नि:शुल्क उपलब्ध झाल्यास सुदृढ समाज निर्माण होईल, असे मत त्यांनी मांडले.

सुसंवादाने मत्स्य उत्पादनात वाढ

आसाम आणि बिहारमधील गोड्या पाण्यातील मासेमारी पद्धतीचा अभ्यास करून आणि प्रत्यक्ष 8 हजारांवर अधिक मच्छिमारांना प्रशिक्षण देणारे कोलकाता येथील केंद्रीय गोड्यापाण्यातील मासेमारी संशोधन संस्थेचे (आयसीएआर) गणेश चंद्र यांनी मत्स्य उत्पादनात सुसंवादाचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन मांडले. गेल्या तीन दशकात देशाच्या मत्स्य उत्पादनात 21 पटीने वाढ झाली आहे. मच्छिमार आणि मत्स्य उत्पादक यांना मिळणाऱ्या माहितीतील अडथळे आणि विसंवाद यामुळे या क्षेत्राचे नुकसान होत आहे. ब‍हुतांश मच्छिमार अशिक्षीत असल्याने मासेमारी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. योग्य माहितीच्या अभावामुळे सहकारक्षेत्राच्या फायद्यापासूनही हे मच्छिमार दुर्लक्षित राहतात. मच्छिमारांना वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र,रेडियो आदी समाजमाध्यमांपासून मिळणारी माहिती ही स्थानिक माहितगारांपासून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या तुलनेत कमी असल्याचे निरीक्षणही त्यांनी मांडले. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक संपर्क माध्यमांचा उपयोगासह सुसंवाद उपयुक्त ठरेल, असा विचार श्री चंद्र यांनी मांडला.

मातीजन्य किटाणुंपासून बालकांचे संरक्षणाचा विज्ञानाद्वारे आवाज

‘मातीतील किटाणुंमुळे बालकांना होणारे आजार व ते दुर्लक्षून ओढवणारे आरोग्याचे संकट’, यावर आधारित संशोधन मांडणाऱ्या लखनऊ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या डॉ सुमन मिश्रा यांनी दैनंदिन जीवनातील सामान्य विज्ञानच उपस्थितांसमोर आणले. मातीतील किटाणुंचा पोटात होणार प्रवेश  त्यामुळे बालकांमध्ये होणारी पोटदुखी याकडे पालकांकडून होणारे दुर्लक्ष आणि भविष्यात या आजाराचे दुष्परिणाम अशी श्रृंखलाच डॉ. मिश्रा यांनी मांडली. जागतिक आरोग्य संघटनेनेही पोटदुखीमुळे विद्यार्थ्यांची  शाळेत गळती होत असल्याचे निरीक्षण मांडल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातही याच कारणामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली. सध्या लखनऊ जिल्ह्यातील 5 गावे आणि 6 शाळांमध्ये या दिशेने कार्य सुरु झाले असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याचप्रमाणे, सीएसआयआर दिल्लीच्या वैज्ञानिक डॉ. अवनी खाटकर यांनी हवामान शास्त्राआधारे देशातील उर्जाक्षेत्रात वापरात असलेल्या ग्रीडमध्ये सुधार होवून स्मार्टग्रीड तयार करण्याचे संशोधन मांडले. शिलाँग येथील इशान्य भारत विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ मेघाली यांनी इशान्य भारतातील महाडेक खडकांच्या संरक्षणाची गरज व्यक्त केली. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याच्या नादौन येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रा.सुनिल कुमार शर्मा यांनी येत्या काळात ऑनलाईन शिक्षणाची तंत्रस्नेही पद्धत मांडली.

अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषध निर्माण विभागाचे प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक आणि प्रियदर्शनी जे.एम.औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिनेश चाफले होते.

पहिल्या सत्रात जेनेक्स्ट जिमोनी संस्थेच्या डॉ.सुप्रिया काशिकर यांनी संस्थेद्वार करण्यात आलेल्या अँटीबॉडी संशोधनाची माहिती दिली. अन्य देशांच्या तुलनेत भौगोलिक परिस्थितीनुसार भारतात आढळणारी वैविद्यपूर्ण अँटीबॉडीज आणि त्याचा टॉप डाऊन व बॉटम पद्धतीने विभागणी करून झालेल्या अभ्यासाबाबत डॉ.काशिकर यांनी मांडणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ विकास खरात आणि गोरखपूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.सुधीर श्रीवास्तव हे अध्यक्षस्थानी होते.


Back to top button
Don`t copy text!