कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेती, पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । मुंबई । हरित क्रांती होण्यापूर्वी देशाला अमेरिकेतून आयात होणाऱ्या निकृष्ट धान्यावर विसंबून राहावे लागे. परंतु आज जगभरातील लोक अन्नधान्य उत्पादनाकरिता भारताकडे पाहत आहेत. हरित क्रांती पाठोपाठ देशात श्वेत क्रांती  आली व आता नील क्रांतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. जगाची वाटचाल आता पुनश्च शाश्वत शेतीकडे सुरु आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी कडधान्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करावा, तसेच पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत शुक्रवारी (दि. ६) राहुरी, जि. अहमदनगर  येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षांत समारंभाला राज्याचे कृषी मंत्री तसेच विद्यापीठाचे प्र-कुलपती अब्दुल सत्तार, अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, कुलगुरु डॉ पी जी पाटील, कुलसचिव प्रमोद लहाळे  यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे  सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.

हरित क्रांतीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर व हायब्रीड बियाणे उपयुक्त समजले गेले. परंतु रासायनिक खतांमुळे मातीचे आरोग्य बिघडले, असे सांगताना आज हरयाणा, गुजरात या राज्यांमध्ये सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग होत आहेत. या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी देखील अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.  महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. द्राक्ष, कांदा, संत्री या बाबतीत राज्याची उत्पादने देशात प्रसिद्ध आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठांनी आजवर चांगले काम केले आहे. हे कार्य अधिक पुढे नेऊन कृषी विद्यापीठांनी आदर्श व अनुकरणीय विद्यापीठ व्हावे, असे राज्यपालांनी सांगितले.

कृषी स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा  गोरगरीब जनतेच्या तसेच सामान्य शेतकऱ्यांच्या  हितासाठी  उपयोग करावा असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले, पोपटराव पवार यांनी आपल्या ग्रामविकास कार्यातून गावातील सामान्य माणसाला सक्षम केले असे त्यांनी सांगितले.

कृषी वैज्ञानिकांनी आपले नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे कारण त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांनी सांगितले. ऊस उत्पादन क्षेत्रात साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर व्हावा असे त्यांनी सांगितले. कृषी स्नातकांनी निसर्ग व पर्यावरणाचे विश्वस्त असल्याची भावना ठेवून जग अधिक सुंदर करावे असे आवाहन त्यांनी केले.

पदवीदान समारंभात विविध विद्याशाखांमधील एकुण ६८३४ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!