पिंपोडे बुद्रुक,वाठार स्टेशन परिसरात कोव्हीड सेंटर सुरु करण्याची मागणी


 

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.१२: गेल्या साडे पाच महिन्यापासून कोरोना संसर्गने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आत्ता शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. दिवसेंदिवस याचा आकडा सातशे ते आठशेच्या घरात पोहचू लागला आहे.जिल्हा आणि तालुका स्तरावरील आरोग्य विभागाकडून बाधितांना मिळणाऱ्या ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व इतर सुविधाचा अभाव,प्रशासनावरील वाढता ताण, आणि अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतं आहे. गेल्या काही दिवसापासून भागांतील अनेक रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्याने, अनेकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.अशा प्रसंगामुळे आगामी काही दिवसामध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक,वाठार स्टेशन पासून दोन ते तीन किलोमीटर परिसरात ५० बेडचे स्वतंत्र कोव्हिड सेंटर सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाचा कोव्हिड सेंटरसाठी विचार झाल्यास रिपाई पक्ष्याचा तीव्र विरोध असून त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मागील दोन दिवसामध्ये राऊतवाडी,अनपटवाडी आणि इतर दोन गावांतील रुग्णांना वेळेत ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर, आरोग्य सेवा मिळू न शकल्याने त्यांना प्राणाला मुकावे लागले आहे. तालुक्यात शनिवार दि.१२ तारखे पर्यंत १६५८ रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यापैकी वाठार स्टेशन,पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपोडे ग्रामीण रुग्णालय अंतर्गत ४०६ रुग्ण भागात बाधित आढळलें,तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण आकडेवारी पैकी संसर्ग समुह,वातावरणातील बदल व इतर कारणाने गेल्या एका महिन्यात भागात नव्वद टक्के पेशंट कोरोना बाधित आढळलें आहेत. बरे होण्याचे प्रमाण सुध्दा सकारात्मक आहे.दिवसेंदिवस प्रत्येक गावांत दररोज दोन तीन पेशंट आढळून येत आहेत. कोरोनाचा सामना व मुकाबला करुन रोजचे जीवन व येणाऱ्या अडचणीवर मात करतं,आयुष्य सकारात्मक जगले पाहिजे यात तिळमात्र शंका नाही.तसेच या कोरोना आजारातून सकारात्मक मानसिकता व योग्यवेळी उपचारामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण सुध्दा अधिक असल्याने ही सुध्दा समाधानकारक बाब आहे. मात्र या संसर्गाचे काही दिवसात या आकड्यात झपाट्याने वाढ होत चालेली आहे. खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतं आहेत आणि ते सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. कोरोनाचा सामना करणारे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबावर बेतणारे प्रसंग हे त्यांनीच जाणो. या महामारीवर मात करण्यासाठी व खबरदारीची उपाययोजनेसाठी उत्तर कोरेगाव तालुक्यातील ४७ गावांसाठी या दोन्ही गावांच्या, मुख्यवस्ती, वर्दळीचे ठिकाण आणि ग्रामीण रुग्णालय परिसर सोडून ५० बेडचे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मशीन, पी.पीई.किट, आरोग्य अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी टीम, तपासणी कक्ष, स्वतंत्र रुग्णवाहिका व इतर लागणाऱ्या सुविधासह अशा स्वरूपाचे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची मागणी केली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!