
जागतिक तरस दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील किरकसाल (ता. माण) येथे तरस संवर्धन आणि जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ : जागतिक तरस दिनाचे औचित्य साधून किरकसाल संवर्धन प्रकल्पाच्या वतीने येत्या सोमवारपर्यंत विशेष ‘संवर्धन व जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात प्रत्यक्ष माळरानात जाऊन तरसांच्या अधिवासाचे रक्षण करणे आणि वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
निसर्गाचा सफाई कामगार धोक्यात
तरस हा मृत जनावरे खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतो. त्यामुळे रोगराई पसरण्यास आळा बसतो. मात्र, वाढती पाणीटंचाई तसेच अधिवासातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे या उपकारक प्राण्याच्या अस्तित्वावर आता मोठी आव्हाने उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर किरकसाल संवर्धन प्रकल्पाने या विशेष सप्ताहाचे नियोजन केले आहे. यामध्ये ‘ग्रीन गार्डियन्स’च्या स्वयंसेवकांचा मोठा सहभाग राहणार आहे.
संवर्धन सप्ताहातील प्रमुख उपक्रम:
-
कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती: जंगलातील आटलेल्या नैसर्गिक पाणीस्रोतांच्या जागी कृत्रिम पाणवठे पाण्याने भरून तरसांसह इतर वन्यजीवांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वयंसेवकांच्या मदतीने हे काम प्रत्यक्ष वनक्षेत्रात होईल.
-
हालचालींचे निरीक्षण व गुहांचे संरक्षण: क्षेत्रीय संनियंत्रण आणि ‘साईन सर्व्हे’द्वारे तरसांच्या हालचालींचे निरीक्षण केले जाणार आहे. पाऊलखुणा, विष्ठा आणि इतर खुणांवरून त्यांच्या वावराचा अभ्यास करून त्यांच्या गुहांचे संरक्षण केले जाईल.
-
ग्रामस्थ व मेंढपाळांमध्ये जनजागृती: तरस हा प्राणी मानवासाठी कसा उपयुक्त आहे, याबाबत परिसरातील ग्रामस्थ आणि मेंढपाळांमध्ये जनजागृती करून त्यांच्यात या प्राण्याबद्दल आदर निर्माण केला जाईल.
-
लोककथांचे संकलन: गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून तरसाशी संबंधित लोककथा आणि त्यांच्या जुन्या अनुभवांचे संकलन करून त्याचा उपयोग संवर्धनासाठी केला जाणार आहे.
‘हीच जागतिक तरस दिनाला खरी मानवंदना’
“किरकसालचा सुमारे १८०२ हेक्टरचा परिसर तरसांसाठी सुरक्षित राखणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मानवासाठी उपकारक असलेल्या तरसाला उन्हाळ्यात पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे, हीच खऱ्या अर्थाने जागतिक तरस दिनाला आमची मानवंदना ठरेल.”
– चिन्मय सावंत (वन्यजीव अभ्यासक, किरकसाल)
