मान्याचीवाडीचा अनोखा पॅटर्न! नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गावात जनावरांसाठी उभारले अत्याधुनिक ‘स्नानगृह’


सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने नदी व ओढ्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जनावरांसाठी अत्याधुनिक स्नानगृह उभारले आहे. यात शॉवर आणि संगीताचीही सुविधा असून सांडपाणी व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे.

स्थैर्य, मान्याचीवाडी (सातारा), दि. २३ : नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विकासाचे केंद्र बनलेल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आता जनावरांसाठी अत्याधुनिक ‘स्नानगृह’ उभारून राज्यासमोर आणखी एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे. गावातील पाळीव जनावरांमुळे नदी, नाले व ओढ्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला असून, लोकसहभागातून हे सुसज्ज स्नानगृह उभारण्यात आले आहे.

शॉवरखाली आंघोळ आणि संगीताचीही सुविधा

ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासन विविध योजना राबवत असले तरी, जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही. ही बाब लक्षात घेऊन मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. या स्नानगृहात जनावरांच्या आंघोळीसाठी चक्क ‘शॉवर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आणि जनावरांना शांत वाटावे यासाठी संगीताचीही (Music) विशेष सुविधा देण्यात आली आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया आणि परसबागेसाठी वापर

केवळ स्नानगृह उभारून ग्रामपंचायत थांबलेली नाही, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजनही करण्यात आले आहे. जनावरांच्या स्नानानंतर तयार होणाऱ्या प्रदूषित पाण्यावर योग्य प्रक्रिया करून, त्याचा पुनर्वापर परसबागेसाठी केला जातो. तर उर्वरित पाण्यासाठी शोषखड्यांची (Soak Pits) व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही.

ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच रवींद्र माने, सदस्य उत्तम माने, दिलीप गुंजाळकर, मनीषा माने, लता आसळकर, निर्मला पाचुपते, सीमा माने, दादासो माने, अधिकराव माने, विठ्ठल माने आणि ग्रामअधिकारी अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

“या अत्याधुनिक स्नानगृहामुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला मोठा आळा बसेल. गावाच्या दृष्टीने हा अत्यंत फायदेशीर उपक्रम आहे.”

– मारुती माने (स्थानिक शेतकरी)


Back to top button
Don`t copy text!