
साताऱ्यातील नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी १०६ एकर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले असून, यामुळे साताऱ्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ एप्रिल : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सातारा जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील महसूल विभागाची सुमारे ४२.५५ हेक्टर (अंदाजे १०६ एकर) जमीन ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे’ (MIDC) वर्ग करण्याला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या वतीने स्वागत केले असून, “सातारकरांचे स्वप्न सत्यात आणण्यात आम्ही कोठेही कमी पडलो नाही याचा अभिमान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
सातारच्या अर्थचक्राला मिळणार गती
खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले की, ऐतिहासिक सातारा जिल्हा आता विकसनशीलतेकडून वेगाने विकासाकडे झेपावत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात जिल्ह्याने भरारी घ्यावी, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा आणि सातारच्या अर्थचक्राला गती मिळावी, यासाठी सातारा येथे आयटी पार्क उभारण्याचे अनेक वर्षांचे प्रयत्न आता पूर्णत्वाकडे जात आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी उदयनराजे यांनी स्वतःची लिंब येथील जागाही देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र आता शासनाने महसूलची जागा वर्ग करून सातारकरांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.
तरुणांचे स्थलांतर थांबणार; कौटुंबिक स्वास्थ्य जपले जाणार
सध्याच्या डिजिटल युगात साताऱ्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रातील प्रगल्भ बुद्धिमत्ता सातत्याने पुणे-मुंबई किंवा परदेशाकडे धाव घेत आहे.
“मुले परगावी आणि पालक साताऱ्यात, अशी अवस्था आज बहुतांश कुटुंबांची आहे. आता आयटी पार्क साताऱ्यातच होत असल्याने, अनेकांना आपल्या शहरातच रोजगार मिळेल. यामुळे तरुणांचे स्थलांतर थांबेल आणि कौटुंबिक स्वास्थ्य राखले जाण्यास मदत होईल. रोजगाराच्या या संधींमुळे प्रत्येक कुटुंबाचा विकास होण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य होईल,” असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
विकासाच्या महामार्गावर सातारा : इतर महत्त्वाचे प्रकल्प
साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या इतर प्रकल्पांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की:
-
वैद्यकीय क्षेत्र: साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच, एमआयडीसीतील शासकीय दूध डेअरीच्या जागेत ESI हॉस्पिटल सुरू होत असल्याने कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
-
शिक्षण: कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात लवकरच कार्यान्वित होईल.
-
पायाभूत सुविधा: सातारच्या विमानतळाची बाब प्रस्तावित असून, जिल्हा कारागृह स्थलांतरित करण्याचे नियोजनही सुरू आहे.
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही वर्षांतच ऐतिहासिक सातारा जिल्हा एक ‘सुसंपन्न विकसित जिल्हा’ म्हणून ओळखला जावा, यासाठी आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

