
मलठण येथील इंदिरानगरमध्ये काँक्रिटीकरण व विद्युतीकरण कामांचे शानदार भूमिपूजन पार पडले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी नागरिकांना हक्काची घरे देण्याची ग्वाही दिली.
स्थैर्य, फलटण, दि. 23 एप्रिल : फलटण शहरातील मलठण येथील ‘इंदिरानगर’ वसाहतीत काँक्रिटीकरण आणि विद्युतीकरणाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना सज्जड दम देत, ‘इंदिरानगरच्या विकासात कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या घरी थेट हंडा मोर्चा काढू आणि मी स्वतः त्यात सर्वात पुढे असेन,’ असा कडक इशारा दिला आहे.
या शानदार भूमिपूजन सोहळ्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. नरसिंह निकम, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘कुणाच्यात हिंमत असेल तर अडवून दाखवा’ – रणजितसिंह
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, “मलठणने नगराध्यक्ष निवडून दिला आहे, त्यामुळे आता विकासकामे वेगाने मार्गी लागतील. इंदिरानगरच्या विकासकामांत जर कुणी अडथळा आणून दाखवला, तर मी त्यांच्या घरी हंडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यात मी सर्वांच्या पुढे असेन. आता कुणाच्यात हिंमत असेल तर त्यांनी ही कामे अडवून दाखवावीत. लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यास ‘रणजितसिंह’ काय चीज आहे, हे मी दाखवून देईन.” तसेच, अनुप शहा यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार नगरपरिषदेचे विभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत विचार सुरू असून, इंदिरानगरमध्ये भव्य ‘ॲम्फीथिएटर’ उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
‘हुकूमशाही संपली, आता सर्वांगीण विकास होणार’ – आ. सचिन पाटील
आमदार सचिन पाटील म्हणाले, “इंदिरानगर हे आमचे कुटुंब आहे. पूर्वीच्या काळात शहरातील ओपन स्पेस स्वतःच्या नावावर करण्याचे काम काहींनी केले. पण आता ती हुकूमशाही संपली आहे. रणजितदादा मुंबईत मंत्र्यांकडे बसून विकासकामे खेचून आणत आहेत. इंदिरानगरचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही.”

‘पहिल्याच मीटिंगमध्ये १ कोटींचा निधी मंजूर’ – समशेरसिंह
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी दिलेला शब्द आम्ही आता पूर्णत्वास नेत आहोत. नगरपरिषदेच्या पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही मलठणसाठी तब्बल १ कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. आमच्या कार्यकाळातील पहिल्या कामाची सुरुवात आम्ही आमच्या घरातून (मलठणमधून) करत आहोत. इंदिरानगरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांसोबतच, जे नागरिक वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करतील त्यांना पालिका गट-तट न पाहता अनुदान देणार आहे.”
‘इथल्या एका विटेलाही धक्का लागू देणार नाही’ – ॲड. नरसिंह निकम
ज्येष्ठ नेते ॲड. नरसिंह निकम यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “इंदिरानगरशी आमचे भावनिक नाते आहे. पूर्वीच्या काळात इथल्या नागरिकांना उठवण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा कै. हिंदुराव यांनी छातीचा कोट करून घरे वाचवली होती. आता रणजितदादा आणि समशेरदादा इथल्या एका विटेलाही धक्का लागू देणार नाहीत. ३५ वर्षे ज्यांची सत्ता होती, त्यांना जर तुमची खरंच तळमळ असती, तर त्यांनी तुमच्या नावावर जागा करून दिल्या असत्या. पण जे जुने नेते हिरावून घेत होते, तेच आताचे सरकार तुम्हाला हक्काने देत आहे,” असे निकम यांनी ठणकावून सांगितले.
‘आता नागरिकांना मिळणार हक्काची घरे’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी जुन्या सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. “माजी नगराध्यक्ष रघुनाथराजे यांनी इंदिरानगर येथे बेकायदेशीरपणे स्वतःचे नाव लावले होते. तसेच नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी ही वसाहत आमच्या मालकीची असल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडे म्हटले होते. मात्र, आता रणजितसिंह आणि समशेरदादा यांच्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत,” असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आभार नगरसेवक रोहित नागटिळे यांनी मानले. याप्रसंगी युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, किरण राऊत, राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे, अमित भोईटे, नगरसेविका सौ. कांचन दत्तराज व्हटकर, माजी नगरसेवक सुरेश पवार, तेजसिंह भोसले, अमोल सस्ते, प्रतापसिंह नाईक निंबाळकर, भाजपा नेते बजरंग गावडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

