निवडणुका जवळ आल्यानेच महापुरुषांच्या विषयी प्रेम उफाळून आले आहे : श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य | दि. 30 डिसेंबर 2023 | फलटण | निवडणुका जवळ आल्या की, छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य म. फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी प्रेम उफाळुन आल्याने फलटण शहरात त्यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्याची आवई उठवून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न फलटणकर खपवून घेणार नाहीत असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

फलटण शहरात छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले, म. गांधी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारुन त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेले आदर्श समाजासमोर विशेषतः तरुणांसमोर ठेवण्यासाठी आम्ही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहोत, त्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून या सर्व महापुरुषांचे पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळे उभारण्याबाबत नगर परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून नगर परिषदेत त्याबाबत रीतसर ठराव झाले असून सदर सर्व पुतळ्यांच्या ठिकाणी व परिसर सुशोभीकरणाचे ठराव नगर परिषदेने मंजूर केल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

केवळ सदर ठराव मंजूर करुन आम्ही गप्प बसलो नाही तर महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी शासकीय निधी उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी, नियम, निकष यांची माहिती असल्याने या महापुरुषांच्या स्मारकांसाठी गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून या महापुरुषांचे पुतळे तयार करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून परिसर सुशोभीकरण कामे काही ठिकाणी सुरु आहेत, काही पूर्णत्वास गेली आहेत, काहींची टेंडर्स निघाली असल्याचे निदर्शनास आणून देत या संपूर्ण प्रक्रियेची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापुरुषांचे पुतळे व परिसर सुशोभीकरण प्रक्रिया सुमारे ६/७ वर्षांपासून सुरु आहे. दि. १६ मे २०१६ रोजी फलटण नगर परिषद सर्वसाधारण सभेत छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा उभारणे, तसेच शहरातील म.गांधी यांचा सध्या असलेला पुतळा जुना व जीर्ण झाल्याने तो बदलणेस आणि म. फुले पुतळा समितीच्या मागणी नुसार म. फुले यांच्या सध्याच्या पुतळ्याच्या जागी नवीन पूर्णाकृती पुतळा उभारणीस मान्यता देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

फलटण नगर परिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दि. ३० एप्रिल २०२१ च्या पत्रा नुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य म. फुले उत्सव समिती सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वरील दोन्ही महामानवांचे शहरात असलेले पुतळ्यांचे जागी पूर्णाकृती पुतळे उभारणे व परिसर सुशोभीकरण करणेस केलेल्या मागणीस नगर परिषद सर्वसाधारण सभा दि. २३ एप्रिल २०२१ च्या सभेत मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य म. फुले यांचे शहरातील अर्ध पुतळ्यांच्या जागी पूर्णाकृती पुतळे उभारणे कामी पुतळा समिती अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार दि. २६ एप्रिल २०२१ च्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली असून सदर दोन्ही पुतळे समितीने तयार करुन घेऊन उभारणीस परवानगी मागितल्याचे या ठरावात नमूद आहे.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वैशिष्टयपूर्ण योजनेंतर्गत नगर परिषदांना निधी वितरीत करण्यात आला, त्यामध्ये फलटण नगर परिषदेस १० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते म. फुले पुतळा चौक रस्ता विकसित करणे व डेकोरेटिव्ह पोल उभारणे कामी ६३ लाख रुपये, छ. शिवाजी महाराज चौक परिसर विकसित करणे ६० लाख रुपये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर विकसित करणे ६० लाख रुपये, म. गांधी चौक (गजानन चौक) ते बादशाही मस्जिद रस्ता विकसित करणे १ कोटी रुपये उपलब्ध झाले असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

एकूणच शहरातील महापुरुषांचे पुतळे पूर्णाकृती करणे, परिसर सुशोभित करणे व त्या परिसरातील रस्ते, बाजूचे वीज खांब डेकोरेटिव्ह उभारणे ही प्रक्रिया सुरु असून त्यास नगर परिषद आवश्यक मान्यता आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेण्याची प्रक्रिया आणि सदर कामे प्रत्यक्ष सुरु असताना केवळ श्रेय घेण्यासाठी स्थानिक विकास निधीतून निधीच्या तरतुदींचे पत्र देवून आपण हे पुतळे उभारणी करीत असल्याचे दाखविणे अयोग्य व या शहराच्या सर्वांगीण विकासात सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहण्याच्या परंपरांना खंडित करणारे असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!