दैनिक स्थैर्य | दि. 17 ऑगस्ट 2024 | फलटण | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासोबत मैत्रीत्वाचे संबंध निर्माण झालेले आहेत. रणजितसिंह ज्यांच्यासोबत मैत्री करतो; त्यावेळी ईतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून मैत्रीसाठी पुढे येतो. त्यामुळे राजकारण किंवा व्यक्तिगत कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी काळात श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची साथ सोडणार नसून फलटण तालुका हा आता परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असल्याचे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोळकी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री ना. खाडेंच्या उपस्थितीत सायकल वाटप व कामगार मेळावा
भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संकल्पित केलेल्या मोफत सायकल वाटप हे रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी राज्याचे कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये विंचुर्णी रोड येथील शुभारंभ मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे. यासोबतच ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य बांधकाम कामगारांना कामगार किट्सचे वाटप व भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन फलटण पंढरपूर रोडवरील विडणी येथील श्री दत्तकृपा मंगल कार्यालयामध्ये दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे; अशी माहिती यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यात राजे गटाच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्रित करणार
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यातील राजे गटाच्या विरोधात सर्वपक्षीयांना एकत्रित करून भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी करणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून भारतीय जनता पार्टीला मताधिक्य असल्यामुळे फलटणची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. यावेळी राजे गटाच्या विरोधात सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून एकच उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी दिली.
कार्यकर्त्याला वापरून सोडून देण्याची श्रीमंत रामराजेंची जुनी सवय
फलटण तालुक्यातील अगदी स्वतःच्या पार्टीतील कार्यकर्त्याला सुद्धा वापरून सोडून देण्याची सवय ही श्रीमंत रामराजे यांच्यासह राजे गटातील नेत्यांना असल्यामुळे राजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राजे गटातील 90% हुन अधिक कार्यकर्ते हे आमच्या संपर्कात असून यामध्ये काहीजण लवकरच राजे गटाला रामराम ठोकतील असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
माणिकराव सोनवलकरांच्या पाठोपाठ अनेकांचा भाजपमध्ये ओघ सुरू
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते माणिकराव सोनवलकर यांनी मोठ्या धाडसाने राजे गटाला राम राम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितल्यानुसार सोनवलकर यांचा यथोचित सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये करण्यात येणार आहे. माणिकराव सोनवलकर यांच्या पाठोपाठ राजे गटामधील अनेक दिग्गज नेते व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी ओघ सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असेही रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.