
साताऱ्यात संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सुधाकर बोरगावकर स्मृती राज्यस्तरीय कथासंग्रह पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ‘लेखकांनी मानवी मूल्यांसाठी निर्भीडपणे लेखन करावे,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
स्थैर्य, सातारा, दि. २८ : “आत्ताचा काळ हा लेखकांनी स्वातंत्र्याचे भान जोपासण्याचा व आत्मपरीक्षण करण्याचा आहे. मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी निर्भीडपणे लेखन करावे,” असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘प्रबुद्ध भारत’चे साहित्यिक सुधाकर यशवंत बोरगावकर स्मृती ‘राज्यस्तरीय कथासंग्रह पुरस्कारांचे’ वितरण किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. हा शानदार सोहळा साताऱ्यातील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये पार पडला.
यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे, व्यासंगी अभ्यासक व समीक्षक डॉ. गजानन अपिने (पुणे), संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे, अध्यक्ष रमेश इंजे, उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे आणि विश्वस्त डॉ. जयपाल सावंत उपस्थित होते.
नवनवीन प्रश्नांना भिडण्याची गरज
“सर्जनशील लेखक वैश्विक व स्थानिकही असतो. तो संवेदनशील असला पाहिजे आणि त्याला माणूस वाचता आला पाहिजे. लेखकाने नवनवीन प्रश्नांना भिडून मानवी मूल्ये व विवेकाची जोपासणा करण्याची आज नितांत गरज आहे.”
– किशोर बेडकिहाळ (ज्येष्ठ विचारवंत)
यावेळी बोलताना प्रमोद कोपर्डे म्हणाले की, लेखकाने मानवी संबंधांची खोली आणि अवकाश याबरोबरच आपल्या लेखनात कार्यकारणभाव जोपासला पाहिजे. स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण करताना स्त्री लेखिकांनी अतिशय मोकळेपणे व परखडपणे मांडणी करण्यास धजावले पाहिजे. तर, स्पर्धेचे परीक्षक डॉ. गजानन अपिने यांनी कथासंग्रहांचे मूल्यमापन करताना, जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद साहित्यात उमटत असल्याचे स्पष्ट केले.
कथासंग्रह स्पर्धेतील विजेते मानकरी :
-
प्रथम क्रमांक : ‘तो स्पर्श’ – कविता पाचंग्रे-खरात (शिरूर, पुणे)
-
द्वितीय क्रमांक : ‘तू ही गोष्ट सांगायला नको होती!’ – सुनील साळुंखे (डोंबिवली, मुंबई)
-
तृतीय क्रमांक : ‘भुईकोर’ – गोपाल शिरपूरकर (चंद्रपूर)
-
उत्तेजनार्थ पुरस्कार : ‘सारीपाट’ – अलका मोकाशी (नागपूर) आणि कथाकार प्रदीपकुमार कांबळे-बहेकर (पुणे). (तसेच ‘कडेवर आणि इतर कथा’साठी महेश सोवनी – भिवंडी, ठाणे यांनाही उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला, मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत).
सर्व विजेते व मान्यवरांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुढील वर्षी कादंबरीसाठी स्पर्धा
यावेळी आकर्षक सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तयार करणारे पुणे येथील कलावंत अतुल घाटगे, भारती सावंत (जयसिंगपूर) व मंजिरी दुधगावकर (पुणे), तसेच सुधाकर बोरगावकर यांची नात डॉ. मनाली बोरगावकर (एमडी आयुर्वेद) आणि चिरंजीव इंजिनिअर महेंद्र बोरगावकर यांचाही सत्कार करण्यात आला.
निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी चालू वर्षात ‘कादंबरी’ वाङ्मय प्रकारावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. जयपाल सावंत यांनी आभार मानले.

