मुख्यमंत्री वयोश्री योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद; आळजापूरचे सरपंच अ‍ॅक्शन मोडवर

२१० पैकी १४० जणांनी घेतला सहभाग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन आता जसं अ‍ॅक्शन मोडवर आले आहे, तसे आता आळजापूरचे सरपंच शुभम नलवडे हेही अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये त्यांच्या बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत, यासाठी सरपंच शुभम नलवडे यांनी आपले प्रशिक्षित सहकारी यांना बरोबर घेऊन आयोजित केलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक घेवून आलेल्या आळजापूर येथील २१० पैकी १४० जणांनी स्वयंस्फूर्तीने या शिबिरात भाग घेतला, तर उर्वरितांचे अर्ज दोन दिवसात भरले जातील, असे सरपंच नलवडे यांनी सांगितले.

या योजनेचा यशस्वीतेसाठी चंद्रकांत पवार, आशा स्वयंसेविका सौ. शुभांगी फडतरे, सौ. सुषमा नलवडे, सौ. मालन जाधव तसेच बार्टी संस्थेचे सागर काकडे, संदीप नलवडे, ग्रामरोजगार सेवक विकास काकडे, रवी जगताप, राहुल काकडे, मोहन मसुगडे तसेच उपसरपंच सौ. गीतांजली मनोज नलवडे यांनी सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!