ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर हरवले ‘धुक्यात’! राज्याच्या नंदनवनात पर्यटकांना मिळतोय सुखद गारवा


 संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असताना महाबळेश्वरमध्ये मात्र रात्रीच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. उन्हाळ्यातही हिवाळ्याचा सुखद अनुभव मिळत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

स्थैर्य, सातारा , दि. २८ : अवघ्या महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट उसळली असताना, राज्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मात्र वातावरणातील अनोख्या बदलामुळे पर्यटकांना सुखद गारव्याचा अनुभव मिळत आहे. शहरात रात्रीच्या वेळी चक्क धुक्याची चादर पसरत असून, या आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकही सुखावले आहेत.

उन्हाळ्यातही हिवाळ्याची अनुभूती

राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळिशीच्या घरात पोहोचलेला असताना, महाबळेश्वर याला सुखावह अपवाद ठरत आहे. उन्हाळ्याच्या हंगामातही येथे हिवाळ्यासारखी थंडी, गार वारा आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव पर्यटकांना येत आहे. दिवसभर किंचित उष्णता जाणवत असली, तरी येथील कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर राहत आहे. तर, रात्रीच्या वेळी तापमानात लक्षणीय घट होत असून, रविवारी किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

‘वीकेंड’ला पर्यटकांची मोठी गर्दी

या बदलत्या आणि आल्हाददायक हवामानामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणावर वळू लागली आहेत. विशेषतः ‘वीकेंड’च्या (सुट्टीच्या) काळात कुटुंबासह पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असून, सायंकाळच्या वेळी सुटणारा गारवा पर्यटकांचा थकवा दूर करत आहे.

वेण्णा लेक परिसरात सध्या पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येत असून, अनेक जण नौकाविहाराचा (Boating) आनंद लुटताना दिसत आहेत. थंड हवा, गार वारा आणि धुक्याची हलकी चादर यामुळे वातावरण अधिकच मनमोहक बनले असून, उन्हाळ्यातही हिवाळ्याची झलक देणारे हे वातावरण पर्यटकांसाठी सध्या खास आकर्षण ठरले आहे.


Back to top button
Don`t copy text!