वाई अर्बन बँकेत कोणताही गैरव्यवहार नाही; दिशाभूल करणाऱ्यांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा!


वाई अर्बन बँकेच्या फलटण शाखेतील थकबाकीदार ‘तेज मोटर्स’चे जामीनदार कैलास दोशी यांच्या मालमत्तेचा १६ एप्रिलला कायदेशीर लिलाव होणार असल्याने, त्यांनी बँकेवर खोटे आरोप केले आहेत. बँक त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 15 एप्रिल : सातारा जिल्ह्यातील नावाजलेली आणि अग्रगण्य बँक असलेल्या ‘वाई अर्बन बँके’मध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही अथवा बँकेच्या कोणत्याही संचालकाविरुद्ध केसेस दाखल नाहीत. फलटण येथील कैलास दोशी यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे बँकेविरुद्ध जी नोटीस दिली आहे, ती पूर्णपणे खोडसाळपणाची आहे. याप्रकरणी बँक योग्य ती गंभीर दखल घेऊन कैलास दोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात ‘अब्रुनुकसानीचा दावा’ (Defamation Suit) दाखल करणार असल्याची अधिकृत स्पष्टोक्ती बँक प्रशासनाने दिली आहे.

लिलाव टाळण्यासाठी खोटे आरोप:

बँकेने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, वाई अर्बन बँकेच्या फलटण शाखेतील कर्जदार ‘तेज मोटर्स’चे प्रोप्रायटर राजाराम फणसे व अभिजीत फणसे यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाला श्री. कैलास दोशी हे कायदेशीर जामीनदार आहेत. फणसे यांनी कर्जाची परतफेड न केल्याने ते थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे वसुलीच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार, जामीनदार असलेल्या कैलास दोशी यांच्या प्रॉपर्टीवर सहकार कायद्याच्या कलम १५६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

शासकीय आणि कायदेशीर सर्व पूर्तता करून दोशी यांच्या या प्रॉपर्टीचा लिलाव बँकेतर्फे येत्या १६ एप्रिल रोजी काढण्यात आला आहे. आपली प्रॉपर्टी लिलावात निघत असल्याच्या रागातून आणि ही कारवाई टाळण्यासाठीच दोशी यांनी बँकेबद्दल जाणीवपूर्वक चुकीचे व निराधार आरोप केले असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

स्वतः सवलत घेऊन कर्ज केले होते बंद:

विशेष म्हणजे, श्री. कैलास दोशी हे स्वतः जेव्हा बँकेचे कर्जदार होते, तेव्हा त्यांनी बँकेकडून मोठी ‘सूट’ (सवलत) घेऊन आपले कर्ज बंद करून घेतले होते. बँकेने त्यांना त्यावेळी सहकार्य केले होते. मात्र, आता जामीनदार म्हणून जबाबदारी घेण्याची वेळ आल्यावर ते बँकेची बदनामी करत आहेत, ही बाब प्रशासनाने निदर्शनास आणून दिली आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बँकेचे आवाहन:

कैलास दोशी हे जाणीवपूर्वक करत असलेल्या दिशाभूल करणाऱ्या व चुकीच्या माहितीवर बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन ‘वाई अर्बन बँक’ प्रशासनाने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!