“विरोधकांचा राजकीय नकाशाच पुसून टाकू; सर्व ९ जागांवर विजय मिळवणारच!” : विडणीचे सरपंच सागर अभंग यांचा एल्गार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

विडणी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या अपात्रतेनंतर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विरोधकांना उघड आव्हान दिले आहे. ‘सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधकांचा राजकीय नकाशा पुसून टाकू,’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

स्थैर्य, विडणी, दि. १५ एप्रिल : “ही पोटनिवडणूक साधी नाही, हा लढा स्वाभिमानाचा, विकासाचा आणि सत्तेवर आपला हक्क सिद्ध करण्याचा आहे. इथे कोणाच्याही बापाचं राज्य नाही, निर्णय फक्त विडणीकरांचा होईल आणि विजय फक्त विकास आघाडीचाच होईल,” असा सडेतोड एल्गार विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी पुकारला आहे.

विडणी ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी आता पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच सागर अभंग यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना थेट आणि उघड आव्हान दिले आहे.

“विरोधकांचा राजकीय नकाशा पुसून टाकणार”

विडणीकरांना साद घालताना सरपंच अभंग म्हणाले की, “ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य अपात्र झाले आहेत, त्यामुळे काही जणांना वाटतंय की आता मैदान मोकळं आहे. पण त्यांना स्पष्ट सांगतो की, विडणी अजून जिवंत आहे आणि विडणीकर अजून जागे आहेत. ही निवडणूक आम्ही फक्त लढणार नाही, तर विरोधकांचा राजकीय नकाशाच कायमचा पुसून टाकणार आहोत.”

“एकही जागा सोडायची नाही…”

या निवडणुकीत गावोगावी आणि घरोघरी जाऊन जनसंपर्क साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “प्रत्येक गल्लीमध्ये आणि प्रत्येक घरात जाऊन लोकांना विचारू की, ‘विकास हवा का फक्त आश्वासने?’ आमचा निर्धार पक्का आहे, एकही जागा सोडायची नाही, सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवायचाच,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“भीती नाही, दबाव नाही… फक्त भगवा!”

वर्षानुवर्षे केवळ राजकारण करणाऱ्यांना आता विडणीकरच चोख उत्तर देतील, असा इशारा देत सरपंच सागर अभंग यांनी नागरिकांना एकजुटीचे आवाहन केले आहे. “चला, एकदिलाने उभे राहूया. कोणतीही भीती नाही, कसलाही दबाव नाही, आपले फक्त एकच लक्ष्य असेल आणि ते म्हणजे सर्व जागांवर भगवा फडकवणे. विडणी ठरवणार आणि इतिहास घडवणार!” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरपंच सागर अभंग यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि थेट आव्हानामुळे विडणी गावातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून, आगामी पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!