दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२३ | सातारा |
सातार्याजवळ यवतेश्वर घाटात दोन चारचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक युवती ठार झाली असून चारजण जखमी झाले आहेत. गायत्री दीपक अहिरराव (वय २१, रा. सातारा) असे मृत युवतीचे नाव आहे. ती सातारा नगरपालिकेत नोकरी करीत होती.
या अपघाताची माहिती अशी, सातारा ते कास रस्त्यावरील यवतेश्वर परिसरातील सिद्धटेक हॉटेलच्यानजीकच होंडा सिटी आणि क्रेटा कार या दोन कारचा समोरासमोर अपघात झाला. साधारण शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात गायत्री अहिरराव ही युवती ठार झाली, तर चौघेजण जखमी झाले. अपघातानंतर उपस्थितांनी जखमी अपघातग्रस्तांना गाडीतून बाहेर काढत सातार्यातील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रात्री उशिरा हा अपघात घडल्याचे कळताच सातारा तालुका पोलीस दाखल झाले. गंभीर जखमीस सातार्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात ठार झालेल्या गायत्री अहिरराव या युवतीचे वडील दीपक आहेरराव हे देखील काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये मृत पावले आहेत. तेही सातारा नगरपालिकेचे कर्मचारी होते. अगदी तरुण वयात गायत्री हिचे अपघाती निधन झाल्याने सातारा नगरपालिका कर्मचारी व सातारकर नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, अपघाताच्या घटनेने सातारा-कास रस्त्यावरील अपघातांबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.