कोयना धरणातून केवळ पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग; वीजनिर्मिती आणि सिंचन बंद


स्थैर्य, सातारा,  दि. ४ जून : राज्यात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिली असून जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आता केवळ पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांची तहान भागवण्यासाठी कोयनाच्या पायथा विद्युतगृहातून नदीपात्रात १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

हवामान विभागाने ‘एल निनो’मुळे यंदा पाऊस उशिरा पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम मान्सूनवर झाला आहे. पाऊस लांबल्याने कोयना धरणाच्या पाणीपातळीत मोठी घट झाली असून सध्या धरणात केवळ १०.५३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना मंत्रालय स्तरावरून धरण व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यावरच या तीन जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

एक जूनपासून कोयना प्रकल्पाचे नवीन जलवर्ष सुरू झाले आहे. या नव्या वर्षात पाण्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. ‘एल निनो’चा प्रभाव कायम राहिल्यास वीजनिर्मितीच्या पाणी कोट्यात कपात करावी लागेल. पाऊस पडेपर्यंत केवळ पिण्यासाठीच धरणातील पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

‘एल निनो’ ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढण्याची एक नैसर्गिक हवामान घटना आहे. याचा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे वाऱ्यांची दिशा आणि दाब बदलतो. परिणामी, पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा काही भागात दुष्काळ पडण्याची शक्यता असते.

गेल्या वर्षी कोयना प्रकल्पातून वीजनिर्मितीचे काम चांगल्या प्रकारे झाले होते. सिंचन आणि पिण्याची गरज भागवूनही धरणात साडेदहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, सध्या वीजनिर्मिती बंद ठेवली असून वरिष्ठ पातळीवरील सूचनेनुसार पाऊस पडेपर्यंत केवळ पिण्यासाठीच पाणी सोडले जाईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!