पर्यावरण दिनानिमित्त कोंडवे खिंड येथे वृक्षारोपण व श्रमदान मोहीम; १०० देशी वृक्षांची होणार लागवड


स्थैर्य, सातारा,  दि. ४ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सातारा शहर अधिक हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी वन विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शुक्रवार, ५ जून रोजी कोंडवे खिंड वनक्षेत्रात विशेष पर्यावरण संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत वृक्षारोपण आणि स्वच्छतेवर भर दिला जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि वृक्षसंवर्धनाला चालना देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या अनुषंगाने मोहिमेत तीन महत्त्वाचे उपक्रम राबविले जातील. कोंडवे खिंड वनक्षेत्रात श्रमदानातून प्लास्टिक कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच या परिसरात १०० देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाईल.

या उपक्रमांतर्गत एका जुन्या वडाच्या झाडाचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण करून त्याला नवजीवन देण्याचे महत्त्वपूर्ण कामही केले जाणार आहे. “चला, एक पाऊल हरित साताऱ्याच्या दिशेने!” असा संदेश देत ही मोहीम जनचळवळ बनवण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईते आणि उपवनसंरक्षक अमोल सातपुते हे उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम सकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडणार आहे.

या उपक्रमात वन विभागासोबत ड्रोन्गो पर्यावरण संरक्षण संस्था, मेरी संस्था, हरित सातारा ग्रुप, कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुप, अवार्ड संस्था आणि राजे करिअर अकॅडमी या संस्था सहभागी होणार आहेत.

तसेच गच्चीवरची परसबाग, शाहूपुरी रनर्स, ओम ग्रुप शाहूपुरी, हिंदवी पब्लिक स्कूल आणि वेद अकॅडमी यांचाही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असणार आहे. परिसरातील निसर्गप्रेमी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी या श्रमदानात व वृक्षारोपणात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!