जिल्ह्यात पाणीटंचाई भीषण; १०३ गावे व ३४३ वाड्यांना ९५ टँकरचा आधार


स्थैर्य, सातारा,  दि. ४ जून : सातारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून, सध्या जिल्ह्यातील १०३ गावे आणि ३४३ वाड्या-वस्त्यांना ९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पाणीटंचाईचा फटका जिल्ह्यातील तब्बल एक लाख २९ हजार ७५१ नागरिकांना बसत आहे. या वस्त्यांसोबतच जिल्ह्यातील ८६ हजार ६५१ पशुधनही या भीषण पाणीटंचाईने होरपळून निघाले आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास जिल्ह्यातील टँकरची संख्या लवकरच शंभरी पार करण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती माण तालुक्यात निर्माण झाली आहे. एकट्या माण तालुक्यामध्ये तब्बल ४६ टँकर सुरू आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी आणि नागरिकांना संरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत.

या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात आतापर्यंत ४० खासगी विहिरी आणि २४ बोअरवेलचे तात्पुरते अधिग्रहण केले आहे. आगामी काळात पावसाची ओढ कायम राहिल्यास टँकरची मागणी आणि विहिरींच्या अधिग्रहणात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

तालुकानिहाय अधिग्रहणाची आकडेवारी पाहता, प्रशासनाने माण तालुक्यात ११ विहिरी आणि ८ बोअरवेल, खटावमध्ये १२ विहिरी आणि ७ बोअरवेल, तर कोरेगावमध्ये ५ विहिरी आणि ४ बोअरवेल अधिग्रहित केले आहेत.

तसेच वाई तालुक्यात ३ विहिरी, कऱ्हाडमध्ये ३ विहिरी आणि २ बोअरवेल, फलटण तालुक्यात २ विहिरी आणि २ बोअरवेल, जावळीत २ विहिरी, खंडाळा येथे १ बोअरवेल आणि महाबळेश्वरमध्ये १ विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!