वाठार पोलिसांची धडक कारवाई; गांजा विक्रीच्या आरोपावरून संशयित महिलेला अटक, २३ हजारांचा मुद्देमाल जप्त


स्थैर्य, सातारा,  दि. ४ जून : वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्या एका संशयित महिलेवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांना २३ हजार २७५ रुपये किमतीचा ९३१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात यश आले आहे.

साताराचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना वाठार स्टेशन गावाच्या हद्दीत गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वाठार-लोणंद मार्गालगत एका महिलेकडून ही बेकायदेशीर विक्री केली जात होती.

या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती परवानगी घेतली. त्यानंतर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी नियोजनबद्धरीत्या छापा टाकला.

या छाप्यात रुपाली लक्ष्मण बुधावले (वय ३२, राहणार वाठार स्टेशन, तालुका कोरेगाव) या संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता, त्यात ९३१ ग्रॅम वजनाचे गांजा वनस्पतीचे शेंडे आणि पाने आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची बाजारातील किंमत २३ हजार २७५ रुपये इतकी आहे.

गांजा विक्रीच्या आरोपावरून या संशयित महिलेला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव करत आहेत.

या कारवाईत नायब तहसीलदार सुनिता दिमते, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, सहाय्यक फौजदार बुवासो वाघमारे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.


Back to top button
Don`t copy text!