

स्थैर्य, सातारा, दि. ४ जून : सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी चोरीच्या आरोपावरून एकाला अटक केली आहे. या संशयिताकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सातारा तालुका आणि सातारा शहर पोलीस ठाण्यातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
परळी येथील समीर मुलाणी यांच्या घराच्या अंगणातून २९ मार्च रोजी त्यांची हिरो स्प्लेंडर (एमएच ११ बीएम ०१९७) ही दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सातारा शहर परिसरात एक संशयित चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने कोडोली येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चार दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव रेहान सिकंदर मुलाणी (वय २०, रा. अमरलक्ष्मी चौक, कोडोली, सातारा) असे आहे. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार संदीप कर्णे करत आहेत.