विद्वेष पसरविणा-या तीन वाहिन्यांना जाहिराती नाहीत : राजीव बजाज


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११: समाजामध्ये विद्वेष पसरविणा-या व विषारी वातावरण निर्माण करणा-या तीन वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचे बजाज ऑटो कंपनीने ठरविले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी या तीन वाहिन्यांची नावे उघड केलेली नाहीत.

टीआरपी वाढविण्याचे रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले असून, याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली होती. त्यानंतर राजीव बजाज यांनी ही घोषणा केली. राजीव बजाज यांनी सांगितले की, तुमचा ब्रँड उत्तम व विश्वासार्ह असेल तर त्याच्या बळावर व्यवसाय आणखी मोठ्या प्रमाणावर वाढविता येतो. भक्कम पायावर उभ्या असलेल्या व्यवसायातून समाजहिताच्या काही गोष्टीही करता येतात. समाजात विद्वेष पसरविणा-या लोकांशी बजाज ऑटो कोणताही संबंध ठेवू इच्छित नाही. त्यामुळेच तीन दूरचित्रवाहिन्यांना आम्ही जाहिराती न देण्याचे ठरविले आहे.

ते म्हणाले की, कोणती दूरचित्रवाहिनी किंवा वृत्तपत्र समाजात विषाक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते हे आम्हाला लगेच ओळखता येते. अशांना जाहिराती न दिल्याने व्यवसायावर जो परिणाम होईल तो होऊ द्या.

जावेद अख्तर यांच्याकडून कौतुक

राजीव बजाज यांच्या भूमिकेचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले की, स्पष्टवक्ते वडील राहुल बजाज यांचा वारसा राजीव चालवीत आहेत. विद्वेष पसरविणा-या दूरचित्रवाहिन्यांना जाहिराती देणार नाही हे सांगायला जिगर लागते व ते राजीव बजाज यांच्याकडे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!