‘गुन्ह्यांना आळा घालून नशाखोरांना रोखणार’; नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची कऱ्हाडला भेट, गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा


सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कऱ्हाड शहर व तालुका पोलीस ठाण्यांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गुन्हेगारी आणि युवा पिढीतील वाढत्या नशेखोरीला आळा घालण्यावर पोलिसांचा भर राहील, अशी ग्वाही दिली.

 स्थैर्य, सातारा, दि. ५ : कऱ्हाड शहरात वाढणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासह नशाखोरांना रोखण्यावर पोलिसांचा प्रमुख ‘फोकस’ राहील. गुन्हेगारी प्रवृत्तीवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काल रात्री कऱ्हाड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शहर आणि तालुका पोलीस ठाण्यांना भेटी देऊन शहरात फिरून पाहणी केली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी व माध्यमांशी थेट संवाद साधून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

‘कऱ्हाड आणि पाटणचा गुन्हेगारी पॅटर्न वेगळा’

जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, “जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही फोकस केला आहे; त्यात गुन्ह्यांवरील नियंत्रणाला फार महत्त्व दिले आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण या तालुक्यांची ‘थीम’ वेगळी आहे. येथील गुन्हेगारीची प्रवृत्ती, गुन्हा करण्याची पद्धत (Modus Operandi) आणि गुन्हेगारांचा वावर वेगळा आहे. त्यामुळे या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून काम करण्यात येणार असून, पोलिसांच्या नियोजनातही विशिष्ट बदल केले जातील.”

नागरिकांशी थेट संवाद साधणारे ‘एसपी’

गेल्या दशकभरातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीपेक्षा श्री. पिंगळे यांनी कऱ्हाडमध्ये आल्यानंतर थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला. यामुळे ‘नागरिकांसह वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी थेट संवाद साधणारे एसपी’ अशी त्यांची परिसरात ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सूचना ऐकून घेत त्यावर काय उपाययोजना करता येतील, हे जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दर तीन महिन्यांतून एकदा या सर्व गोष्टींचा नव्याने आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नशेखोरी आणि गांजा तस्करांवर फास आवळणार

शहरातील पाहणी दौऱ्यात त्यांनी संवेदनशील ठिकाणांसह प्रमुख मिरवणूक मार्गांची अधिकाऱ्यांसोबत जाऊन पाहणी केली. नागरिकांशी थेट संवाद साधत तालुक्यातील अडचणी, समस्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती त्यांनी जाणून घेतली.

“सध्या युवा पिढीमध्ये नशा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे गांजा तस्करांसह नशाखोरांना रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला कायमचा पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. यावर टप्प्याटप्प्याने आणि प्रभावीपणे उपाययोजना केल्या जातील.”

– निखिल पिंगळे (पोलीस अधीक्षक, सातारा)


Back to top button
Don`t copy text!