‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ‘मी’कडून ‘आम्ही’पर्यंतचा प्रवास’; साताऱ्यात ‘शताब्दी मंथन’ कार्यक्रमात प्रमोद बापट यांचे प्रतिपादन


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साताऱ्यात ‘शताब्दी मंथन’ कार्यक्रम पार पडला. यावेळी क्षेत्रीय प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांनी संघाच्या १०० वर्षांच्या वाटचालीचा विस्तृत आढावा घेतला.

 स्थैर्य, सातारा, दि. ५ : “संघाची कार्यपद्धती अशी आहे की, यामध्ये सर्वजण आपापली वैयक्तिक ओळख विसरून एकत्र येतात आणि समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व चांगले कार्य करण्यासाठी प्रतिबद्ध होतात. इथेच काम करणाऱ्या प्रत्येकाचा ‘मी’पासून ते ‘आम्ही’पर्यंतचा प्रवास सुरू होतो,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय (महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा) प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वैचारिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘शताब्दी मंथन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर कोल्हापूर विभाग प्रचार प्रमुख विवेक मंद्रूपकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘संघ कामाचा आता विशाल वटवृक्ष’

प्रमोद बापट यांनी आपल्या भाषणात संघाच्या शताब्दी वाटचालीचा विस्तृत आढावा घेतला. ते म्हणाले, “आपला भारत देश एकेकाळी सर्व क्षेत्रांत अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली होता. मात्र, गेल्या दोन हजार वर्षांत झालेल्या परकीय आक्रमणांमुळे येथील धर्म, संस्कृती आणि समाजव्यवस्था ढासळत गेली.” कबीराच्या ‘चदरिया झिनी रे झिनी’ या दोह्याचा संदर्भ देत त्यांनी समाजावर झालेल्या आघातांचे वर्णन केले. “इस्लामी आणि इंग्रजांच्या आक्रमणामुळे आमच्या समाजाचे स्वत्व, आत्मविश्वास दुखावला गेला आणि समाज न्यूनगंडात गेला. यावर उपाय म्हणून १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी निस्वार्थ, सज्जन आणि सक्षम व्यक्ती घडवण्यासाठी ‘संघ शाखा’ ही अनोखी कार्यपद्धती सुरू केली. आज संघ कामाचा एक विशाल वटवृक्ष झाला असून, समाजजीवनाच्या जवळपास सर्व क्षेत्रांत संघाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. ३४ विविध संघटना आणि भारताबाहेर ३२ देशांमध्ये संघाचे काम पोहोचले आहे.”

‘पंच परिवर्तना’वर भर देण्याचे आवाहन

दुसऱ्या सत्रात कोल्हापूर विभागाचे प्रचार प्रमुख विवेक मंद्रूपकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दिलेल्या ‘पंच परिवर्तन’ या सूत्राची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

“कुटुंबप्रबोधन, स्वबोध, सामाजिक समरसता, पर्यावरण आणि नागरी शिष्टाचार या पाच विषयांवर पुढील काळात काम करण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले आहे. या पाचही विषयांचा समाजातील व्यक्ती आणि कुटुंबांमध्ये प्रचार होऊन त्याची प्रत्यक्ष कृती होणे अत्यंत आवश्यक आहे.”

– विवेक मंद्रूपकर (कोल्हापूर विभाग प्रचार प्रमुख)

मान्यवरांशी मुक्त संवाद

या मार्गदर्शनानंतर उपस्थित पत्रकार आणि साहित्यिकांनी संघ विषयावर अनेक प्रश्न विचारून वक्त्यांशी मुक्त संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. अविनाश सुतार यांनी केले.

यावेळी संघाचे प्रचार विभागाचे प्रांत मंडळ सदस्य रमेश मंत्री, कोल्हापूर विभाग संपर्क प्रमुख डॉ. समीर सोहनी, सातारा जिल्हा कार्यवाह महेश शिवदे यांच्यासह अनेक वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, साहित्यिक, युट्युब चॅनेल संचालक, मीडिया इन्फ्लुएन्सर आणि संस्कृत भारतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विचारमंथन कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ने झाली.


Back to top button
Don`t copy text!