एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! जिल्ह्यातील सर्व एसटी स्थानकांवर १ जूनपासून मोफत स्वच्छतागृहाची सुविधा


एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त १ जूनपासून सातारा जिल्ह्यातील सर्व ११ डेपोंमधील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहेत.

 स्थैर्य, सातारा, दि. ५ : एसटीने प्रवास करणाऱ्या आणि तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ भरणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व एसटी स्थानकांतील स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आगामी १ जूनपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.

५ ते १० रुपये मोजूनही अस्वच्छता; आता महामंडळाचा पुढाकार

सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने एसटी स्थानकांवर प्रवाशांची मोठी वर्दळ वाढली असून अस्वच्छतेतही भर पडत आहे. सध्या अनेक ठिकाणी ‘सुलभ शौचालय’ किंवा इतर संस्थांकडून स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी प्रवाशांकडून ५ ते १० रुपये आकारले जातात. मात्र, पैसे देऊनही स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या कायम तक्रारी असतात.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसटी स्थानके, आगारे, स्वच्छतागृहे, चालक-वाहकांची विश्रांतीगृहे आणि पाणपोई यांचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने गेल्या १५ एप्रिलपासून प्रति तिकीट २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ लागू केला आहे. यातूनच आता प्रवाशांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

अशी असणार स्थानकांवरील नवी व्यवस्था :

  • ११ डेपोंचा समावेश: सातारा जिल्ह्यातील सर्व ११ डेपोंमध्ये १ जूनपासून मोफत स्वच्छतागृहाची अंमलबजावणी होईल.

  • दर ४ तासांनी स्वच्छता: स्थानक आणि आगारात अस्वच्छता राहू नये म्हणून दर चार तासांनी स्वच्छतेची कामे केली जातील.

  • नवे कचरा डबे: स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नवे कचरा डबे बसवले जाणार आहेत.

  • पाणपोई आणि विश्रांतीगृहे: प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या पाणपोईची नियमित स्वच्छता व देखभाल केली जाईल. तसेच, एसटीचे चालक-वाहक यांच्या विश्रांतीगृहांमधील सुविधाही सुधारण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

“प्रवाशांना १ जूनपासून स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर मोफत करता येणार आहे. स्थानक आणि आगारात त्यांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व डेपोंमध्ये ही सुविधा लागू केली जाईल, ज्यामुळे स्वच्छतेचा दर्जा निश्चितच उंचावेल.”

– ज्योती गायकवाड (विभाग नियंत्रक, सातारा)


Back to top button
Don`t copy text!