
स्थैर्य, सातारा, दि. 5 नोव्हेंबर : लाखो भाविकांचे आराध्य दैवत व कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवस्थानचा पारंपारिक शाही मंगल विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशी, तुळशी बारस (रविवार, दि. 2 नोव्हेंबर) रोजी मध्यरात्री बारा वाजता पारंपारिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात झाला. श्रीच्या शाही विवाह सोहळ्यामुळे म्हसवडनगरी भक्तिभाव, आनंद व एकतेच्या रंगांनी उजळून निघाली होती.
या शाही विवाह सोहळ्याच्या तयारीची लगीनघाई मंदिराचे पुजारी, सालकरी व मानकरी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या विवाह सोहळ्याचे दर्शन घेतले. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसर व दर्शन बारीची स्वच्छता,रंगरंगोटी, तसेच मंदिर शिखरावर आकर्षक रंगीत विद्युत रोषणाईने वातावरण अधिक मंगलमय बनले होते.
या पारंपारिक विवाह सोहळ्याचा प्रारंभ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावरश्रीची घटस्थापना, हळदी लावणे व विवाहप्रितर्थ भाऊबिजेस फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी मैदानात श्री म्हातारबाबा देवाच्या भेटीसह करण्यात आला. यावेळी हजारो भाविक व महिलांच्या उपस्थितीत तब्बल 25 तास सलग फटाक्यांची आतषबाजी करून श्रीप्रती श्रद्धा व्यक्त करण्यात आली. दीपावली पाडवा ते मार्गशीर्ष प्रतिपदा या दरम्यान तब्बल एक महिन्याच्या कालावधीत श्रीचा हा शाही विवाह सोहळा विविध धार्मिक विधींसह साजरा केला जातो. दीपावली पाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर मंदिराच्या गाभार्याजवळ श्री म्हातारबाबा समोर सालकरी रामचंद्र व्हंकारे-गुरव व सालकरीण सौ. व्हंकारे गुरव यांच्या हस्ते विविध धान्यांनी युक्त ल्या बीजरोपणाची घटस्थापना करण्यात आली. यानंतर सकाळी हत्ती मंडपात श्रींच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तींना हजारो महिलांनी हळदी लावण्याचा समारंभ मोठ्या भक्तिभावाने व सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात संपन्नकेला. या विवाह निमित्त भाऊबिजेच्या दिवशी सालकरी, मानकरी व पुजारी मंडळींनी राजबागेतील श्री म्हातारबाबा देवालयास भेट देत दिवाळी मैदानात पारंपारिक पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला. श्रीच्या घटस्थापनेनंतर भाविकांनी सलग 12 दिवस अनवाणी पायी नगरप्रदक्षिणा उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाची सांगता श्री म्हातारबाबा देवाच्या मूर्तीसमोर घट उठवून करण्यात आली. या काळात अनेक भाविकांनी रात्रंदिवस उपवास आराधना करून श्रद्धा व्यक्त केली. विशेष म्हणजे, श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी हे जरी हिंदू देवस्थान असले तरीही, या उपवास, आराधना व नगरप्रदक्षिणा उपक्रमात सर्व जाती-धर्मातील भाविकांनीही सहभाग घेतला, ही या देवस्थानाची वैशिष्ट्यपूर्ण व एकात्मतेची परंपरा यंदाही जोपासली गेली.

