
सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे यांनी फलटण पंचायत समितीला सदिच्छा भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची व विविध विकासकामांची पाहणी केली.
स्थैर्य, फलटण, दि. २५ जून : सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे यांनी फलटण पंचायत समितीला सदिच्छा भेट दिली. या भेटीत फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांनी त्यांना प्रशासकीय कार्यपद्धती आणि तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली.
या भेटीदरम्यान महेश गाडे यांनी पंचायत समितीच्या विविध विभागांची आणि दालनांची पाहणी केली. शिवांजली भोसले यांनी शासकीय योजना, लोकाभिमुख उपक्रम, विकासकामांची अंमलबजावणी आणि जनतेला दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनहिताभिमुख कसे करता येईल, यावर दोन्ही सभापतींमध्ये सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली.
अशा अभ्यासपूर्ण भेटींमधून एकमेकांच्या चांगल्या उपक्रमांचा आदर्श घेता येतो. यामुळे ग्रामीण भागातील विकासाला अधिक गती मिळण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास शिवांजली भोसले यांनी व्यक्त केला.
