
स्थैर्य, सातारा, दि. 5 नोव्हेंबर : येथील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर येथे महारक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर मंदिर परिसरात करण्यात आले होते. सातारा येथील अक्षय ब्लड बँकेचे सतीश साळुंखे व दीपज्योती फिजिओथेरपी डॉ. मनोजकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही शिबीरे मोठ्या उत्साहात पार पडली. रक्तदान व फिजिओथेरपी शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलनाने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली. आज आपण पाहतो आहे आपल्या आसपासच्या ब्लड बँकेत रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. या रक्तदान शिबिरात सुमारे 125 पेक्षा जास्त रक्त दात्यानी सहभाग नोंदवला. पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून सलग 25 वर्षे हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. विविध धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रमात ट्रस्टचे मोलाचे योगदान आहे. या रक्तदान शिबिरात महिला भविकांनी मोठया प्रमाणात रक्तदान केले. या दरवर्षी होणार्या रक्तदान शिबिराच्या समाजातील विविध गरजू रुग्णांना मदत केली जाते.
फिजिओथेरपी शिबिरात 70 पेक्षा जास्त नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शन करण्यात आले. या रक्तदान शिबिर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, धनंजय देवी, विशाल शिंदे, श्रीकांत निकम, किशोर डांगे, विजय पालकर, राजेंद्र साळुंखे, हरीश शेठ, यल्लाप्पा पाटील, सतीश मुळे, तेजस जाधव, वीरेंद्र शेळके, आदी उपस्थित होते.

