
स्थैर्य, सातारा, दि. 5 नोव्हेंबर : सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. 7 ते दि. 10 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मैदानावर जिल्हा ग्रंथ महोत्सव होणार आहे. या ग्रंथनगरीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. या महोत्सवात 53 बुक स्टॉल सहभागी झाले आहेत, अशी माहिती ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी दिली.
प्राचार्य डॉ. पाटणे म्हणाले, दरवर्षी जानेवारीत होणारा ग्रंथमहोत्सव मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीचा भाग म्हणून, 25 वा जिल्हा ग्रंथ महोत्सव नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. साहित्यनगरीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि दोन प्रवेशद्वारांना मारुती चितमपल्ली व जयंत नारळीकर यांची नावे देण्यातआली आहेत. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 10.30 वाजता होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व. बा. बोधे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 ते 6 या वेळेत ’सातार्याच्या आठवणीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव, लेखक श्याम भुरके, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, श्रीकांत कात्रे व लेखिका अॅड. सीमंतनी नूलकर सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता स्वरनिनाद निर्मित ’गाणी सोनेरी चंदेरी’ हा कार्यक्रम होणारआहे. शनिवारी (दि. 8) सकाळी 8.30 वाजता बाबासाहेब परीट व डॉ. दिलीप गरुड यांचे कथाकथन, दुपारी 3 वाजता ’सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात पुणे विभागीय अधिस्वीकृत समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, प्राचार्य राजेंद्र शेजवळ व प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ सुखदा खांडगे व डॉ. प्रमिला लोदगेकर यांचा ’लोकरंग महाराष्ट्राचे’ हा लोकगीताचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. 9) सकाळी 9 वाजता शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षणाधिकारी (निरंतर) शबनम मुजावर, आझाद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वंदना नलावडे, करंजे येथील शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील, गोकुळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकाअनघा कारखानीस उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता ’मराठी भाषा अभिजात पुढे काय?’ या विषयावरील परिसवांदात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी अभ्यासक्रम मंडळाचे प्रमुख डॉ. संदीप सांगळे, लेखक स्वप्निल पोरे, डॉ. संदीप श्रोत्री, मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, सायंकाळी 7 वाजता डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तुत ’लोकवाणी’ हा कार्यक्रम डॉ. भावार्थ देखणे आणि सहकारी सादर करणार आहेत. सोमवारी (दि. 10) सकाळी 8.30 वाजता ’इथे घडतात वाचक वक्ते’ हा परिसंवाद हिरवाई प्रकल्पाच्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर कविसंमेलनात विलास वरे, डॉ. मनोहर निकम, यशेंद्र क्षीरसागर, नरेंद्रनिकम, अनिल जाधव, अॅड. संगीता केंजळे, जयश्री जगताप, प्रमोद जगताप, शुभांगी गायकवाड, सुरेखा कुलकर्णी, क्रांती पाटील, ज. तु. गारडे, डॉ. क्षितिजा पंडित सहभागी होणार असून, प्रदीप कांबळे हे सूत्रसंचालक असतील. सायंकाळी 7वाजता ’गाणी मनातली’ कार्यक्रमात डॉ. सुनील पटवर्धन, विजय साबळे, डॉ. सुहास पाटील, दीपाली घाडगे, सीमा राजपूत, अपर्णा गायकवाड हे कलाकार सहभागी होणार आहेत. ग्रंथ महोत्सवातील बुक स्टॉलवर ’मॉरिशसच्या शेतकर्याची कथा’ हे पुस्तक वाचकांना उपलब्ध होणार आहे. सोमवारी (दि. 10) दुपारी 3 वाजता ग्रंथ महोत्सवाचा समारोप होणार असून, मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रकांत दळवी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची प्रमुख उपस्थिती आहे.
