फलटणचा कायापालट: शहरात बसवले आकर्षक स्ट्रीट लाईट

फलटण शहरात आकर्षक स्ट्रीट लाईट बसवले असून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या माध्यमातून शहर विकासाची ग्वाही दिली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २५ जून : फलटण शहरात गिरवी नाका ते माळजाई (महात्मा फुले चौक) या मार्गावर अतिशय आकर्षक स्ट्रीट लाईट बसवण्यात आले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून, आगामी काळात शहरातून जाणाऱ्या संपूर्ण पालखी मार्गावर असेच अद्ययावत लाईट बसवले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

अनेक वर्षांपासून फलटणकरांना आकर्षक स्ट्रीट लाईट केवळ बारामती किंवा इतर मोठ्या शहरांतच पाहायला मिळत होते. मात्र, आता फलटण शहर कात टाकत आहे. शहरातून गेलेल्या संपूर्ण पालखी मार्गावर विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आणि अत्यंत आकर्षक असे स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शहराचे रूप अधिकच खुलून दिसणार आहे.

या विकासकामांबाबत माहिती देताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली. यावेळी ते म्हणाले की, अनेक वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती, जे मंत्री आणि सभापती होते, त्यांनी फलटण शहराचा कायापालट करण्याचा कधीही विचार केला नाही.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही हे विकासाचे काम करत आहोत. फलटण शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचे काम हाती घेतले असून, शहरातील नागरिकांना सर्व आवश्यक व अद्ययावत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही समशेरसिंह यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!