सासकलच्या बबनराव मुळीकांना ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार; राज्य शासनाचा मोठा सन्मान

फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सासकलचे प्रगतशील शेतकरी बबनराव मुळीक यांना राज्य शासनाचा ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २५ जून : फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतशील शेतकरी बबनराव मुळीक यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत २०२६-२७ या वर्षाचा मानाचा ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. फलोत्पादन क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाकडून हा मोठा सन्मान देण्यात आला.

बबनराव मुळीक यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत फलोत्पादन क्षेत्रात विविध यशस्वी प्रयोग राबवले आहेत. फळबाग व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पाण्याची बचत आणि सेंद्रिय व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून त्यांनी दर्जेदार फळनिर्मिती साध्य केली आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची प्रेरणा मिळाली असून ते इतरांनाही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

या पुरस्कारप्राप्तीबद्दल भाडळी बुद्रुक येथील मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मोहनराव डांगे, ग्रामपंचायत सदस्य मोहनराव मुळीक, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश मदने, माजी उपसरपंच संजय चांगण आणि विकास मुळीक यांनी बबनराव मुळीक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुळीक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.

Back to top button
Don`t copy text!