अबब.. दहा फुटी मगर येरळवाडी नदीपात्रात; नागरिकांचा उडाला थरकाप


 

स्थैर्य, निमसोड (जि सातारा), दि.१९ : येरळा धरणाच्या जुन्या नदीपात्रात मगर असल्याचे काही नागरिकांना दिसून आले. त्यानंतर वनविभाग, तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. येरळा नदी पात्रात मगर असल्याचे समजताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मगरीला जेरबंद करण्यात यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी पात्रात समाधानकारक पाण्यात वाढ झाली होती. त्यामुळे येरळा धरणातील पाणी पातळी वाढून धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या वाढत्या व वाहत्या पाण्यातून ही मगर येरळा धरणात आली असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिक व प्रशासनाने व्यक्त केला. या परिसरातील नागरिकांना याठिकाणी मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.

याबाबत नागरिकांनी वनपरीक्षेत्रपाल शीतल फुंदे यांना संपर्क साधला असता, वनविभागाने तातडीने याठिकाणी भेट देत परिसरात पाहणी केली. बनपुरीचे पोलिस पाटील अमोल चव्हाण, वनविभागाचे कर्मचारी व सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख घटनास्थळी दाखल झाले. मगर असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी याठिकाणी बघण्यासाठी गर्दी केली होती. मगरीला पकडण्याचे काम रात्रभर सुरू होते. अंबवडे व बनपुरी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मगर पकडण्यासाठी सातारा व वडूज वनविभाग यांनी शर्थीची प्रयत्न केले. मात्र, स्थानिक मेंढपाळाच्या जाळ्यामुळेच मगर जेरबंद करण्यात यश आले. दुष्काळी भागात मगर दिसणे म्हणजे एक नवलच ठरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी काहीकाळ प्रशासनाला तापदायक ठरली. जेरबंद केलेली मगर सातारा व वडूज वनविभागामार्फत कोल्हापूर वनविभागाकडे सोपविण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!