
माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी तरडगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभाग घेत माऊलींचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला.
स्थैर्य, तरडगाव, दि. १७ जुलै : माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी पत्नी प्रतिमा शेलार यांच्यासह तरडगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेत आरतीमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला.
चित्ररथास भेट आणि आरतीत सहभाग
आळंदी ते पंढरपूर या मार्गावर भक्ती, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा संदेश घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चित्ररथास शेलार दाम्पत्याने भेट दिली. तरडगाव येथील पालखीच्या मुक्कामस्थळी त्यांनी माऊलींचे दर्शन घेतले आणि आरतीत सहभाग नोंदवला. या भक्तीमय वातावरणातून विलक्षण ऊर्जा मिळाल्याची भावना शेलार यांनी व्यक्त केली.
दिंडी कार्यालयास भेट
मुक्कामस्थळी असलेल्या दिंडी कार्यालयासही त्यांनी आवर्जून भेट दिली. विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना नमन करत त्यांनी संवाद साधला. यावेळी वारकरी बांधवांनी केलेला सन्मान शेलार यांनी स्वीकारला.
