
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी फलटण आगाराने शहरातील पाच प्रमुख चौकांतून एसटी बसेस सोडण्याचे विशेष नियोजन केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 17 जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराने विशेष नियोजन केले आहे. शहरातील विविध ५ प्रमुख चौकांतून एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. 17 जुलै ते 18 जुलै दुपारपर्यंत या बसेस उपलब्ध राहणार असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
येथून सुटणार एसटी बसेस
मुधोजी कॉलेजपासून सातारा, पुसेगाव, मुंबई, परळ, बोरिवली, पुणे आणि लोणंद या मार्गावरील बसेस सुटतील. कोळकी चौकापासून दहिवडी, शिंगणापूर, सांगली आणि गिरवी या दिशेने जाणाऱ्या एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे.
गोविंद डेअरी चौकापासून आसू, गुणावरे, पंढरपूर व पूर्व भागाकडे जाणाऱ्या बसेस उपलब्ध असतील. सोमवार पेठ चौकातून मलकापूर, बुलढाणा, शिर्डी, अहिल्यानगर, बारामती आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर बसेस धावतील. तसेच शेती शाळा चौकातून साखरवाडी मार्गावरील सर्व बसेस सोडण्यात येणार आहेत.
सुरक्षित, सोयीस्कर व विश्वासार्ह प्रवासासाठी सर्व वारकरी बांधवांनी एसटी महामंडळाच्या या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.