श्रीराम कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा आज; विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष


श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडत असून, जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द करण्यावर निर्णय होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या रणनीतीमुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 18 मे : श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा आज (सोमवार) दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कारखान्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता ही सभा अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सभेचा एकमेव अजेंडा:

सभासदांना जारी केलेल्या नोटिशीनुसार या सभेमध्ये एकच मुख्य विषय असणार आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यांच्यासोबत दि. ९ मार्च २०२२ रोजी झालेला भागीदारी करार रद्द करण्याबाबत आलेल्या पत्रावर या सभेमध्ये विचार केला जाणार आहे. तसेच, शासनाच्या दि. ८ सप्टेंबर २०२० च्या निर्णयानुसार ‘स्वारस्य अभिव्यक्ती’ (EOI) प्रक्रियेद्वारे कारखाना, अर्कशाळा आणि देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी किंवा खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.

सत्ताधाऱ्यांचे मायक्रो प्लॅनिंग अन् विरोधकांची रणनीती:

या सभेसाठी कारखान्यात सत्ताधारी असलेल्या ‘राजे गटा’च्या वतीने कडेकोट मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. सभास्थळी केवळ अधिकृत सभासदांनाच प्रवेश असून, इतरांना मज्जाव करण्यासाठी कारखाना प्रशासनाने पोलिसांना लेखी पत्र दिले आहे. दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखालील विरोधक काय रणनीती आखणार, याची उत्सुकता आहे. कारखान्यातील सत्ताधाऱ्यांचे कडवे विरोधक असलेले निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आणि फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम हे आजच्या सभेत कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सभेच्या नोटिशीवरून नवा वाद:

सभेला अवघे काही तास उरले असताना, अनेक सभासदांना नोटीस न मिळाल्याने नवा वाद उभा राहिला आहे. फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अनेक सभासदांपर्यंत अद्याप सभेच्या नोटिसा पोहोचलेल्या नाहीत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा (१९६०) आणि कारखान्याच्या उपविधीनुसार नोटीस घरपोच मिळणे बंधनकारक असते. योग्य कायदेशीर प्रक्रियेने नोटीस न मिळाल्यास सभेतील ठरावांवर कायदेशीर गंडांतर येऊ शकते आणि हे ठराव बेकायदेशीर ठरवण्यासाठी सहकार न्यायालयात दाद मागता येते. तसेच, सहकार निबंधक संचालक मंडळावर दंडात्मक कारवाई करू शकतात.” ज्या सभासदांना नोटीस मिळाली नाही, त्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘कोणताही सभासद वंचित राहणार नाही’:

महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांच्या या आक्षेपावर शिवसेना नेते नानासाहेब ऊर्फ पिंटू इवरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “ज्या सभासदांना नोटीस पोहोचली नसेल, त्यांनी थेट सभास्थळी यावे. त्यांची अधिकृत खात्री करून सर्व सभासदांना सभेस उपस्थित राहता येणार आहे. कोणताही सभासद सभेपासून वंचित राहणार नाही, असे मला विचारणेवरून सांगण्यात आले आहे. गटाप्रमाणे ‘स्लिप बॉय’ असणार आहेत. मात्र, बिगरसभासदांना सभेला अजिबात उपस्थित राहता येणार नाही.”

सध्याचे राजकीय वातावरण आणि दोन्ही बाजूंच्या आक्रमक भूमिका पाहता आजची श्रीराम कारखान्याची सभा अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!