आळंदीत इंद्रायणीला महापूर; पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात होणार, भाविकांना न येण्याचे आवाहन

आळंदीत मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे ८ जुलै रोजी होणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

स्थैर्य, आळंदी, दि. ०६ जुलै : महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आळंदीतील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असून, आळंदी नगरपरिषदेचे वॉटरहाऊसही पाण्याखाली गेले आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने आषाढी वारी २०२६ चा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित स्वरूपात घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

पुरामुळे आळंदीत मोठे नुकसान

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पुलाचे कठडे आणि लाईटचे खांब वाहून गेले आहेत. भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी उभारलेली दर्शनबारी आणि सोहळ्यासाठी लावलेले अनेक मोबाईल टॉयलेट्सही पुरात वाहून गेले आहेत. संपूर्ण आळंदीत वीजपुरवठा खंडित झाला असून तंबू व राहुट्यांच्या जागेवर प्रचंड चिखल झाला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या वारकऱ्यांची राहण्याची किंवा निवासाची सोय करणे पूर्णपणे अशक्य झाले आहे.

प्रस्थान सोहळा मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत होणार

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थान कमिटीने ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता संजीवन समाधी मंदिरात होणारा प्रस्थान सोहळा मर्यादित लोकांमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये रथापुढील आणि रथामागील दिंड्यांमधील प्रत्येकी १० वारकरी असे एकूण ५६० वारकरी सहभागी होतील. तसेच परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी, मानकरी सेवेकरी, प्रतिष्ठित, खांदेकरी, कर्मचारी आणि पोलीस दल असे एकूण १६६० व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला जाईल.

वारकऱ्यांना आळंदीस न येण्याचे आवाहन

अॅड. राजेंद्र बाबुराव उमाप (विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख) आणि डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे (प्रमुख विश्वस्त) यांनी जाहीर निवेदनाद्वारे सर्व वारकरी बांधवांना आळंदीस न येण्याचे नमूद केले आहे. वारकऱ्यांनी पाऊस व नैसर्गिक वातावरण पाहून पुढील मुक्कामी सोहळ्यात सहभागी होण्याबाबत विचार करावा. पुढील नियोजनाबाबत संस्थान कमिटी स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या संकटसमयी देवस्थानला सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Back to top button
Don`t copy text!