
फलटण येथील श्रीराम साखर कारखान्याच्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
स्थैर्य, फलटण, दि. ०६ जुलै : फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कारखान्यापुढील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राजकीय हेतूने कारखान्याच्या कामकाजात अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत नेत्यांनी श्रीराम कारखान्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
बैठकीतील सविस्तर आढावा
या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष खटके यांनी केले. डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखाना निवडणुकीपासून ते न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस आणि प्रशासकीय पत्रव्यवहाराची सविस्तर माहिती सर्व सभासदांना दिली.
विरोधकांचे कारस्थान हाणून पाडू : दीपक चव्हाण
माजी आमदार दीपक चव्हाण यांनी राज्य शासनावर कडक शब्दांत टीका केली. मुख्यमंत्री केवळ दोन-चार व्यक्तींचे ऐकून कारखान्याच्या उभारणीत आडकाठी आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हे राजकीय कारस्थान हाणून पाडण्याची गरज असून, कारखान्याचे धुराडे पेटवणे हीच आपली सर्वांची शेवटची संधी आहे. साखरवाडी कारखाना सुरू राहिल्यानेच तो भाग नावारूपाला आला आहे, हे लक्षात घेऊन विरोधकांना वेळीच रोखले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सहकार टिकवण्यासाठी संघर्ष करणार : श्रीमंत संजीवराजे
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सहकार आणि खासगी कारखानदारीतील फरक स्पष्ट केला. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा आणि कामगारांचे पगार वेळेवर व्हावेत, याच उद्देशाने हा कारखाना चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राजकीय दबावापोटी चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. श्रीराम कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा स्पष्ट इशारा श्रीमंत संजीवराजे यांनी दिला.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा सविस्तर घणाघात
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. फलटणमध्ये दोन धरणे बांधली, कमिन्ससारखे मोठे उद्योग आणले, तरीही विधानसभा आणि नगरपालिकेत जनतेने साथ न दिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. एकाला खुश करण्यासाठी सत्तेचा असा गैरवापर यापूर्वी कधीही पाहिला नसल्याचे ते म्हणाले. न्यायालये आणि पोलीस यंत्रणाही आपल्या बाजूने नसल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
स्थानिक विरोधकांवर टीका करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विश्वासराव भोसले, शिवरूपराजे आणि नरसिंह निकम यांच्यावर जोरदार प्रहार केला. या लोकांच्या पाठीशी कोणतेही जनमत नसूनही ते प्रशासकीय मंडळात येऊन सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करून ही मंडळी राजकारण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.